हत्तींसाठी तिलारीतच अघोषित अभयारण्य

संरक्षित क्षेत्रात हत्तींना नेण्यासाठी आराखडा तयार करा
प्राथमिक प्रतिसाद दलही स्थापन करा
वनमंत्री गणेश नाईक यांचे वनाधिकाऱ्यांना आदेश
सिंधुदुर्गात वावर असलेल्या हत्तींना तिलारी धरण परिसरातील संरक्षित क्षेत्रात ठेवण्याची तयारी वनविभागाने चालवली आहे.एका अर्थाने तिलारी आता अघोषित अभयारण्य बनण्याची शक्यता आहे.वनमंत्री गणेश नाईक यांनी हत्तींना तिलारी परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा बनवण्याचे आदेश वन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत गुरुवारी यासंदर्भात बैठक झाली.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करण्याच्या सूचनाही केल्या. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची मंत्री नाईक यांना विनंती केली होती. त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग,प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.व्ही. रामाराव आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हत्तींमुळे नुकसान होते. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेताकडे येणार नाहीत. तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी हत्तींच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस आदींची लागवड करण्यात यावी. तसेच हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळ वापरून लोखंडी कुंपण करण्यासंदर्भात नियोजन करावे. सध्या वावर असलेल्या हत्तींना रेडिओ कॉलर बसवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वन विभागातील प्रशिक्षत मनुष्यबळांचे मार्गदर्शन घ्यावे,अशा सूचनाही वनमंत्री नाईक यांनी वनाधिकाऱ्यांना केल्या.वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा. तसेच यामध्ये बांबू पिकाचा समावेश करून प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही श्री. नाईक यांनी दिले.आमदार केसरकर यांनी वनमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दोडामार्ग येथील उपोषणावेळी दिले होते.या पार्श्वभूमीवर आमदार केसरकर यांनी या बैठकीला तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावले होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,स्वराज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस,दत्ताराम देसाई,दत्तगुरु मयेकर,अमित देसाई, ॲड. अनिल दळवी, राजन मोर्ये आदी बैठकीवेळी उपस्थित होते.
वनमंत्र्यांना दौऱ्यावर येण्याची विनंती
मुंबईस्थित दोडामार्ग तालुका विकास मंडळाचे पदाधिकाऱी ॲड. अनिल दळवी आणि राजन मोर्ये यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना हत्तीबाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दोडामार्ग दौऱ्यावर येण्याची विनंती केली.याला वनमंत्र्यांनी होकार दर्शवला आणि नियोजन करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या.