शिक्षक संपावर असताना देखील शाळा सुरू करत वागदेवासीयांकडून अनोखा उपक्रम!

गावाने एकत्र येत केल्या वागदेतील शाळा सुरू
डीएड, बीएड झालेले विद्यार्थी देणार मुलांना शिक्षणाचे धडे
जुन्या पेन्शन योजने च्या मागणीसाठी राज्यभरात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसत आहे. या संपामुळे शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी गेले आठ दिवस घरी बसून आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कणकवली तालुक्यातील वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, शाळा व्यवस्थापन समिती व विनसम वागदे या मंडळाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर बेमुदत संप काळात शाळा सुरू करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळी 8 ते दुपारी 11 या वेळेत या शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या उपक्रमाबद्दल पालकांमधून कौतुक केले जात आहे. या बेमुदत संपामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वागदे गावात शालेय व्यवस्थापन समिती आर्यदुर्गा, विनसम वागदे व ग्रामपंचायत सरपंच संदीप सावंत (पूर्ण टीम) यांच्या पुढाकाराने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्यात आर्यदुर्गा शाळा, मांगरवाडी शाळा सुरू झाल्या आहेत.आम्ही संपाच्या विरोधात नाही. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम हाती घेतला असल्याचे सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले. संप सुरू झाल्यानंतर अशाप्रकारे स्फुर्तपणे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच व स्थानिक मंडळाच्या माध्यमातून शाळा सुरू झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा बहुदा पहिलाच उपक्रम आहे. गावतील डी. एड., बी. एड. झालेल्या विद्यार्थ्यांकडून या उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक रहावी हा सुद्धा त्या मागील एक उद्देश आहे. असे श्री सावंत यांनी सांगितले.यावेळी सरपंच वागदे संदीप सावंत, संजना घाडीगावकर, उर्मिला घाडीगावकर, आरती घाडीगावकर, दीपा सावंत, शिक्षक विनया बाबू परब, रचना गिरी्श परब, पूजा अनिल चव्हाण, संजय घाडीगावकर, गिरीश परब, बबलू परब, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली