खुद्द कणकवली शहरात अंदर बहर जुगार सुरू, जानवली, कसवण माळरान रात्रीच्या दिव्यात उजळले

कट्टा, सावंतवाडी पासून मारपी कणकवलीत होतात दाखल
खेळी, “गोळी”, आणि “हुशारां”चा पटात भरणा
कणकवली तालुक्यात अंदर बहर जुगाराचे पेव सध्या जोरात असून कणकवली शहरासह शहरालगतच्या गावांमध्ये देखील अंदरबहर पट बसत असल्याने या खुल्या चालणाऱ्या जुगारावर कुणाचाच लगाम नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कणकवली शहरात एका घरासह कणकवली शहरालगतच्या जानवली व कसवण माळरानावर सध्या रात्रीच्या दिव्यांनी माळरान उजळत आहेत. पोलिसांच्या सूत्रांना देखील याची कल्पना असल्याची चर्चा आहे. मात्र यावर कारवाई करण्यासाठी सध्या डोळेझाक केली जात असल्याचे बोलले जात आहे. कणकवली शहरातील परबवाडी, मध्ये भर शहरात अंदर बहर पट सुरू असताना पोलिसांना याचा कानोसा देखील नाही कसा काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या अंदर बहार जुगाराची जोड “गोळी” ही नेहमी चर्चेत असणारी आहे. तर “हुशार” माणसे या सर्व पटात असल्याने कट्टा, सावंतवाडी पासूनचे मारपी या खेळीसाठी एका “गोळी”वर एकत्र होतात. कणकवली सह परिसरातील खेळी या जुगारासाठी नेहमी उत्सुक व आतुरलेले असतात. नियमित चालणाऱ्या या खुल्या जुगाराला कुणाचा आशीर्वाद आहे का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.