जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच
महामार्ग व कणकवली पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरशा कापत गेला. तर या धडकेत केसीसी बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मुंबईच्या दिशेला फिरून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहने बाजूला करेपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. हा अपघात आज शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर रतांबी व्हाळ या ठिकाणी घडला. अपघातानंतर वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह कणकवली व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत उपलब्ध माहितीनुसार जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी केसीसी बिल्डकॉन कंपनीचा टँकर हा महामार्ग वर लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी उभा होता. यावेळी टँकर चालकाने लाल कलरचे बॅरीकटिंग देखील केले होते. याच दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणारा भाजी वाहतूक करणारा कंटेनर वेगाने उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनर चा एका बाजूचा पूर्ण भाग कापून जात आतील भाजी फळे ही अक्षरशा महामार्गावर इतरत्र विखुरली गेली होती. त्यामुळे कंटेनर चे मोठे नुकसान झाले. या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.सुदैवाने यात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. मात्र महामार्ग पोलीस यांच्या मदतीने महामार्ग व वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यावेळी वाहतूक पोलीस प्रकाश गवस, महामार्ग पोलीस विजय देसाई, सानप जगताप, संतोष कराळे, प्रवीण पार्सेकर आदी उपस्थित होते.