सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांना राज्यस्तरीय रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, भिरवंडे गावाचे सुपुत्र, जीवन आधार फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, शाहू- फुले- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते संजय सुभाष कदम यांना या वर्षीचा राज्यस्तरीय “संत रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार 2023” जाहीर झाला आहे. संजय कदम हे संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असून या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत रोहिदास समाजाला एकछताखाली आणण्याचे तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील लहान मोठ्या संघटना, मंडळ यांना एकत्र आणून समाज एकसंघ करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापूर, कोविड १९ कालावधीत केलेले उल्लेखनीय कार्य, आरोग्य- रक्तदान शिबिर, गटई कामगार न्याय देणे, समाजकल्याण मार्फत आयोजित विविध योजनांचा लाभ समाजातील गोरगरीब समाजबांधवांना देण्यास मोलाचे योगदान आहे. राधानगरी तालुक्यातील बलात्कार प्रकरणात राज्यस्तरीय आंदोलन, मोर्चा काढण्यात कदम यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच पाटोला जळगाव जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कुटुंबीयांना भेट देऊन तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जवळ निवेदन देऊन लक्ष वेधून घेतले होते. तसेच राजस्थान जल्लोर येतील इंद्रकुमार मेघवाल या निष्पाप निरागस मुलाचा जातीय व्यवस्थेचा बळी ठरला त्याबाबत उठविलेला आवाज आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय मटका फोड आंदोलन काढण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन कदम यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था, इचलकरंजी या राज्यस्तरीय संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे निवडपत्रात म्हटले आहे. हा पुरस्कार रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २३ रोजी इचलकरंजी येथील घोरपडे नाट्य येथे शिवसेना नेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांच्या शुभहस्ते तसेच विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित प्रदान केले जाणार आहे. गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संजय कदम यांना २०२२ सालाचा देखील राज्यस्तरीय रोहिदासरत्न पुरस्कार गतवर्षी कात्रज पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. संजय कदम यांच्या या निस्वार्थी वृत्तीने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच राज्यातील पदाधिकारी, समाजबांधव, विविध संस्था, संघटना, मंडळ यांच्याकडून संजय कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी