निलंबित महसूल कर्मचारी हांगे आणि कंठाळे यांच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्त

चौकशी करून अहवाल शासनाला पाठवणार

राज शिष्टाचाराचे उल्लंघन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले होते स्वागत

सिंधुदुर्ग महसुल विभागात खळबळ

सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतेवेळी राजशिष्टाचाराच्या नियमांचे पालन न करता बेकायदेशीर रित्या कृत्य केल्याप्रकरणी निलंबित झालेले अव्वल कारकून संदीप हंगे व तलाठी विठ्ठल कंठाळे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याकरिता कोल्हापूर येथील सेवानिवृत्त अधिकारी श्री पाखरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या दोन्ही निलंबित कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवली तालुक्यातील करंजे येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या गोवर्धन गो शाळेच्या शुभारंभ प्रसंगी 11 मे 2025 रोजी आलेले असताना अव्वल कारकून संदीप हांगे व विठ्ठल कंठाळे यांनी त्यांच्या हेलिपॅडच्या ठिकाणी जात त्यांचे स्वागत केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये देखील गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. याबाबत माध्यमांमधून बातम्या येत त्याबाबत प्रशासनावर देखील टीका झाली होती. या साऱ्या घटनेनंतर हांगे व कंठाळे यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते. दरम्यान शासनाकडून पाखरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून त्या दोन्ही निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. या चौकशी दरम्यान ते काही पुरावे देखील तपासणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!