कुडाळ मध्ये महिलादिनी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन’

स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे सकाळी ७ वाजता ”कुडाळ साडी वॉकेथॉन – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम फक्त महिलांसाठी आहे तो दोन गटात होणार असून यात महिलांना साडी परिधान करून सहभागी होता येणार आहे. स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
रविवारी सकाळी ७.०० वा. स्पर्धा सुरु होईल पण त्यापूर्वी सकाळी ६.३० हा रिपोर्टंग टाईम असेल. येथील महालक्ष्मी सभागृहाकडून या वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे. दीड किलोमीटर व तीन किलोमीटर अशा दोन गटात ही वॉकेथॉन होणार आहे. दीड किलोमीटरचा मार्ग महालक्ष्मी सभागृह – भैरव मंदिर -बस स्थानक – बाजारपेठ – वर्दम तिठा – पान बाजार व पुन्हा महालक्ष्मी सभागृह असा राहणार आहे. तर तीन किलोमीटर वाकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह – भैरव मंदिर – बस स्थानक – नक्षत्र टॉवर – जिजामाता चौक – पोस्ट कार्यालय – पोलीस ठाणे – छत्रपती संभाजी महाराज चौक तेथून पुन्हा पोलीस ठाणे – जिजामाता चौक – नक्षत्र टॉवर – बस स्थानक – बाजारपेठ – वर्दम तिठा – पानबाजार व तेथून महालक्ष्मी सभागृह असा राहील. यात सहभागी होणाऱ्या महिलांना पदक, भेटवस्तू व सरप्राईज कुपन त्याबरोबर अल्पोपहारची सोय आयोजकांकडून देण्यात येणार आहे. कोणत्याही वयोगटातील महिला यात सहभागी होऊ शकतात.
लक्षवेधी साडी परिधान करणाऱ्या महिलांमधून प्रथम तीन क्रमांकाच्या महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून आतापर्यंत २०० महिलांनी यात सहभाग दर्शविला आहे. अधिक माहितीसाठी ८२०८७१२६९२ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या वॉकेथॉन चा प्रवेश शुल्क १०० रुपये राहील असे आयोजकांनी कळविले आहे.





