पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांचा मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार
सेवानिवृत्ती बद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची उपस्थिती
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये झाला सोहळा
मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील साकेडी गावचे सुपुत्र पांडुरंग दिगंबर वालावलकर नुकतेच विविध ठिकाणी 35 वर्षे सेवा बजावत मुंबई पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच विशेष पोलीस आयुक्त मुंबई देवेन भारती यांच्यासह अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पांडुरंग वालावलकर यांनी मुंबई पोलीस दलात केलेल्या कामाबद्दल विशेष उल्लेख करत गौरव उद्गार काढले. गुन्ह्यांची उकल करत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान देखील महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार या अधिकाऱ्यांनी काढले. या सत्कारा प्रसंगी उत्तर देताना पांडुरंग वालावलकर यांनी आज पोलीस दलात सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या सेवेचे अर्धे श्रेय हे त्यांच्या कुटुंबीयांना दिले पाहिजे. कारण आमच्या कुटुंबीयांनी घर सांभाळले म्हणूनच अधिकारी म्हणून आम्ही सेवा करू शकलो. मुंबई सुरक्षित ठेवू शकलो. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलाने आपल्या पाल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाच. परंतु त्यासोबत येत्या काळात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी असे नाव कमवा की त्यांच्या नावाने त्यांच्या पाल्यांना ओळखलं गेलं पाहिजे असे उद्गार त्यांनी काढले. तसेच यावेळी सत्कार सोहळा आयोजित करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त मुंबई देवेन भारती यांच्यासह पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जयकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय कृष्णाकांत उपाध्याय आदी उपस्थित होते.