गोपुरी आश्रमात साजरा झाला जागतिक पाणथळ संवर्धन दिवस
2 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात पाणथळ संवर्धन दिन साजरा केला जातो.पर्यावरण आणि जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाण्याच्या जागा येणाऱ्या पिढीसाठी जपून ठेवल्या पाहिजेत, असा संदेश घेऊन गोपुरी आश्रम कणकवली येथे जीवन शिक्षण शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत मुलांची कार्यशाळा रविवारी पार पडली. जीवन शिक्षण शाळेचे आजचे सत्र सृष्टी ज्ञान संस्था मुंबई यांच्यासह संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले करण्यात आले होते.या उपक्रमात सहावी ते नववीच्या 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या सत्राच्या सुरुवातीला वरवडे गावचे सुपुत्र व आयआयटी मुंबई मधून पीएचडी प्राप्त केलेले डॉक्टर मंगेश सावंत यांनी मुलांना पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर विशेषता कोकण सारख्या जैव समृद्ध असलेल्या आपल्या भागात रासायनिक प्रकल्प का नको याबाबत विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात त्यांनी प्रकल्प आणि पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन याविषयी माहिती दिली.
मुख्य सत्राच्या सुरुवातीला सृष्टी ज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रशांत शिंदे यांनी मानवाचे सागराशी असलेले विविधांगी नाते उलगडून सांगितले. सृष्टी ज्ञान संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ओसाड खाडी परिसरात कांदळवन संवर्धनाचे मोठे काम केले आहे. तसेच रायगड भागात गिधाडांचे संरक्षण व संवर्धन करण्यात महत्त्वाचे काम केले आहे. महाड पासून विजयदुर्ग पर्यंतच्या किनारपट्टी भागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना सागरी जैवसृष्टी व पर्यावरण या विषयात प्रबोधन करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात नॅचरलीस्ट फाउंडेशन चे सागरी परिसंस्था तज्ञ श्री सचिन राणे यांनी त्यांच्या ओघवत्या आणि खेळकर शैलीत कोकणातील किनारपट्टीवर ओहोटी दरम्यान साठणाऱ्या सागर तळ्यांमध्ये आढळणार्या अद्भुत सागरी जीवांची रोचक माहिती दिली. सचिन राणे हे पेक्षाने ऑटोमोबाईल इंजिनियर असून त्यांनी आपली सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरण बाबतची आवड जोपासत समाजात याबाबत जाणीव जागृती निर्माण करत आहेत. सत्राच्या शेवटी सृष्टीज्ञान संस्थेचे तन्मय मांजरेकर यांनी देव मासा, उडणारा मासा, प्रवाळ भिंतींचे जग बीबीसीच्या विविध फिल्म दाखवून विद्यार्थ्यांना गुंग करून टाकले बहुसंख्य पालकांनीही या सत्रात तज्ञांशी संवाद करत स्वारस्य दाखवले. यावेळी गोपुरी आश्रम चे संदीप सावंत अध्यक्ष प्रा.डॉ.मुंबरकर सर अर्पिता मुंबरकर सदाशिव राणे चित्रकार नरेंद्र राणे उपस्थित होते. विनायक सापळे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व सृष्टी ज्ञान संस्था व नॅचरल लिस्ट फाउंडेशन या संस्थांचे तज्ञ मार्गदर्शक यांचे आभार मानले. जीवन शिक्षण शाळा उपक्रमा अंतर्गत अशा विविध आणि महत्वपूर्ण विषयांवर मुलांसाठी दर पंधरा दिवसांनी अशा संवादी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत कणकवली परिसरातील पालकांनी या उपक्रमात आपल्या मुलांना सहभागी करण्याविषयीचे आवाहन गोपुरी आश्रम चे सचिव श्री बाळू मेस्त्री यांनी केले आहे.