चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी मिळेल! मात्र भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणार
सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभे करणार
नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
भ्रष्टाचार व चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनात आर्थिक शिस्त आणली जाईल, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला शाबासकीची थाप मिळेल, जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे व जनतेच्या या पैशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्याचा विकास व जनतेची कामे एक सेवक म्हणून मी करेन व अधिकाऱ्यांकडून करून घेईन. जनतेचे राहणीमान व दरडोई उत्पन्न वाढेल असे काम आपल्या कृतीतून दिसेल व हत्ती व वन्यप्राणी उपद्रव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्राणी संग्रहालय करू असे राजाचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कणकवली येथील बांगलादेशी महिलांना झालेली अटक ही रेल्वे स्टेशनवर दाखविण्यात आली मात्र ती संबंधित लॉजवर प्रत्यक्षात झाली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पाच लाखाची ऑफर तीन लाखाच्या तोडपाणीवर नोंद बदलून रेल्वे स्टेशनवर दाखविली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल. बांगलादेशी नागरिक रोहिंगे यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर दखल घेत असताना पोलिसांनी केलेले धाडस गंभीर आहे. म्हणूनच पोलीस महानिरीक्षकांमार्फत याची चौकशी आपण सुरू केली आहे. त्यामुळे कणकवलीतील तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल असेही मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे याबाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले या जिल्ह्यात प्राणीसंग्रहालयाचा एक विचार सुरू आहे. त्याशिवाय उद्योगपती आनंद अंबानी यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. जामनगर येथील वनतारा प्रकल्पात या भागातील हत्ती किंवा उपद्रव करणारे वन्य प्राणी सोडता येतील का याचाही विचार सुरू आहे. बारामती येथील बिबटे या प्रकल्पात सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील हत्ती त्या ठिकाणी सोडता येतील का याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची एक टीम आपल्या संपर्कात आहे असेही ते म्हणाले.