सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात डंपर चालकाला, नियमित व मालकाला अटकपूर्व जामीन मंजूर
संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर कुडासे तिठा येथे बेकायदेशिर खडी वाहतूक करणाऱ्या डंपरला धडक बसून प्रसाद तुकाराम कांबळे (२८ रा. मोर्ले) यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयात डंपरचालक शशिकांत बळीराम देसाई याला नियमित जामिन तर डंपरमालक श्रीकांत राघोबा केसरकर याना अतिरीक्त सत्र न्यायाधिश क्र. २ श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी अटकपूर्व जामिन मंजुर केला. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१६ जानेवारी २०२५ रोजी दोडामार्ग ते तिलारी रस्त्यावर संत हॉस्पिटलसमोर प्रसाद कांबळे हे ज्युपिटर स्कुटर मोर्ले ते गोवा अशी घेऊन जात असताना डंपरला धडक बसली. यावेळी डंपरचालक शशिकांत देसाई याने अविचाराने हयगयीने वाहन चालवून तसेच इंडिकेटर न दाखवता अथवा कोणताही इशारा न करता अचानक गाडी वाळविली. तसेच त्याठिकाणी मालक श्रीकांत केसरकर यांनी घटनास्थळवरून डंपर हलवून खडी उतरविली व पुरावा नष्ट केला. घटनेवेळी वाहनाचे कोणतेही कागदपत्र नव्हते, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. यामुळे याप्रकरणी आरोपींविरूद्ध भा.न्या.स. १०६, १२५, २८१, १०५ तसेच मोटर वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चालक शशिकांत देसाई याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, अटकेत असलेल्या चालकाला जामिन तसेच डंपर मालक श्रीकांत केसरकर याना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यात चालक शशिकांत देसाई याला २५ हजारांचा नियमित तर श्रीकांत केसरकर याना २५ हजारांचा अटकपुर्व जामिन मंजुर करण्यात आला.
दिगंबर वालावलकर /कणकवली