अखेर तेंडोली-शंभूगिरी मठ थांब्याला मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यश

तेंडोली शंभूगिरी मठ थांब्याला एसटी प्रशासनाने मान्यता दिली आहे. या थांब्यामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आवेरे येथे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता.
कुडाळ केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साकव बांधण्यात आला आहे. त्याचा फायदा मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय, आवेरे या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. परंतु साकवाजवळ एसटी बसचा थांबा नसल्याने नदीच्या पलीकडे जाणाऱ्या एस .टी. प्रवाशांना याचा फायदा होत नव्हता. याबाबत गेले कित्येक महिने एसटी महामंडळाकडे तेंडोली ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता. परंतु निवडणुका व आलेल्या आचारसंहिता त्यामध्ये एसटी महामंडळाचा कारभार, या सर्वांचा फटका या स्टॉपला मान्यता मिळण्यासाठी होत होता.
परंतु आचारसंहिता संपल्या संपल्याच निलेश तेंडुलकर यांनी विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत हा थांबा मंजूर करून द्यावा अशी विनंती केली होती. त्याचप्रमाणे सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी अशोक राणे व कुडाळ आगारातील तेंडोलीचे रहिवासी रोशन तेंडोलकर यांनी याबाबत प्रत्यक्षात कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करून अखेर हा थांबा आज मंजूर करून आज घेण्यात आला. सध्या संगणक प्रणालीचा वापर वाहकाकडे असलेल्या मशीन मध्ये होत असल्याने आज शंभुगिरी मठ स्टॉपला मान्यतेचे पत्र कुडाळ आगार प्रमुख यांना प्राप्त होणार असून त्यानंतर संगणकामध्ये योग्य ती दुरुस्त करून बुधवारपासून हा थांबा कार्यान्वित होणार आहे.
या थांब्यावर अनेक वेळा कंडक्टर, ड्रायव्हर गाड्या थांबवत नव्हते. त्यामुळे महिला वर्गाचे खूपच हाल होत होते. या थांब्यामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आवेरे येथे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!