जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ च्या नूतन इमारतीचा व ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचा’ भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, याचा भव्य लोकार्पण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक प्रसंगी नूतनीकरण केलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे आणि नवनिर्मित ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे’ मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करून दीप प्रज्ज्वलन, ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र (बाळा) जठार, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, वारगाव सरपंच नानासाहेब शेट्ये, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये आणि उपसरपंच दिपक पाटणकर उपस्थित होते. शाळेच्या व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक प्रवासाचा व प्रगतीचा आढावा मांडला.
या सोहळ्यात गुणवंतांचा गौरव करताना ५ वी ते ७ वी च्या इंग्रजी व गणित विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा, तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या चमूचा आणि केंद्र व बीट स्तरावरील विजेत्या खेळाडूंचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘ज्ञानकुंज’ या मासिकाचे (बुकलेट) प्रकाशन आणि शिडवणे गावाची माहिती देणाऱ्या ‘विकीपीडिया QR कोड’चे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच स्वामी समर्थ मठ ट्रस्ट, सुरेश कदम व गौरांग कदम यांच्या सहकार्याने आणि गोविंद वाघरे यांच्या प्रयत्नाने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याच सोहळ्यात ‘आदर्श विद्यार्थी’ आणि शाळेसाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या ‘शिक्षकांचा’ सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या या कायापालटाचे आणि डिजिटल उपक्रमांचे कौतुक केले. या सोहळ्याला व्यासपीठावर पोलिसपाटील समीर कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, अभियंता प्रथमेश पाताडे, जयराम गिरकर, उर्मिला सुतार, गायत्री वाघरे, वैशाली शिर्सेकर, अशोक धुमाळ, वारगाव हायस्कूलच्या बाक्रे मॅडम, कोनेवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कुडतरकर, योगेश सुतार, तारीफ शेख, मनाली धुमाळ, अंगणवाडी ताई प्रियांका पाटणकर, अंगणवाडी मदतनीस कविता केतकर, विनोद कोकाटे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी, सर्व शिक्षक वृंद, शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी तसेच शिडवणे गावातील बहुसंख्य पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण कुबल व वेदिका चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेंद्र यादव व हेमा वंजारी यांनी केले. रात्रीच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.





