खारेपाटणसह अन्य आजूबाजुच्या गावात परप्रांतीयांकडून निकृष्ट आईसकँडीची विक्री; युवती भक्ती पिसे व सहकाऱ्यांकडून प्रकार उघड

खारेपाटण येथे परप्रांतीयांकडून चालविण्यात येणाऱ्या आईस्क्रीम कैंडीच्या कारखान्यात निकृष्ट पद्धतीने आईसकँडी बनविण्यात येत असल्याचे खारेपाटण येथील युवती कु. भक्ती पिसे व सहकाऱ्यांनी उघडकीस आणले. आईसकैंडी बनविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य, दुषित व खराब झालेले पाणी वापरण्यात येत होते. ही निकृष्ट आईसकैंडी परप्रांतीयांद्वारे गावागावात विक्रीला नेण्यात येत होती.
खारेपाटण येथील भक्ती पिसे हिने सांगितले की, गेली कित्येक वर्ष खारेपाटण व परिसरामध्ये काही परप्रांतीयांकडून दुचाकीवरून आईस्क्रीम कैडी विकतात. परंतु, ही आईसकेंडी कुठे तयार केले जाते?, कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते याबाबत कुणालाही काही माहीत नव्हते. खेड्यापाड्यात राजरोस आईसकँडीची विक्री चालू होती. यासंदर्भात मला शंका होती म्हणून ही बाब गावातील काही व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, आईस्क्रीम बनविणाऱ्या मुख्य मालकाचा पत्ता सापडत नव्हता. अखेर, या आईस्क्रीम गोदामाचा पत्ता मिळविला. मी व माझे वडील किशोर पिसे व प्रशांत सरफरे असे मिळून आईस्क्रीम गोडाऊन गाठले. त्याठिकाणी परप्रांतीयांकडून अत्यंत घाणेरड्या पाण्यामध्ये व निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून आईस्क्रीम कँडी बनविली जात असल्याचे दिसून आले. या शोधप्रकरणी प्रशांत सरफरे यांचेही सहकार्य लाभल्याचे कु. पिसे हिने सांगितले.सदर घटनेची माहिती पोलीस पाटील- अनिकेत जामसंडेकर,ग्रामपंचायत, पोलीस यांना देऊन, पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर यांनी देखील सदर स्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर याची माहिती आरोग्य विभागाला देताच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.
प्रिया वडाम यांनी याठिकाणी भेट दिली.त्यांनी रितसर घटनेची कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे आम्ही तिघांनी सदर घटनेबाबत सविस्तर माहिती आरोग्य विभागाला दिली, असे कु. पिसे हिने सांगितले.
तेथील कारखान्यात काम करणारे परप्रांतीय कामगार हे गेली अनेक वर्ष खारेपाटण परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडील दुचाकीसुद्धा अनधिकृत असल्याचे समजते. या गाड्यांची कोणतीही कागदपत्रे नसून त्याच दुचाकीवरून हे परप्रांतीय व्यवसाय करतात. तसेच या व्यवसायासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे अथवा खाद्यपदार्थाचे रजिस्ट्रेशन या परप्रांतीयांकडे नव्हते. तरीही ते एवढी वर्ष व्यवसाय करीत होते.असे कु. पिसे हिने सांगितले.
निकृष्ट आईसकँडी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा परप्रांतीयांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या परप्रांतीयांकडील कागदपत्रे पाहिली असता ते सर्व युपी, बिहार आदी भागातून आल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या घटना कुठे घडत असल्यास अश्या विक्रेत्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.





