नद्या गाळमुक्त करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून विशेष मोहिम

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार ठिकाणी निश्चित
पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक उपाय म्हणजे नद्यांमधील गाळ काढून नद्या गाळमुक्त करणे. पहिल्या टप्प्यात ४ ठिकाण निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी १ फेब्रुवारीपासून गाळ काढण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी,ओढे,नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पूराच्या तीव्रतेचा विचार करुन गाळ काढण्याच्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. पहिल्या टप्प्यात जानवली नदी परीसरातील ऊर्सुला हायस्कुल, तेरेखोल नदी बांदा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कुडाळ आणि पिठढवळ नदी परिसरातील ख्रिश्चनवाडी अशा ४ ठिकाणची गाळ काढण्याची मोहिम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. गाळ काढण्यासाठी जिल्हा नियेाजन समितीच्या निधीमधून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुर परिस्थितीचा सामना करावा लागणार नसल्याचेही ते म्हणाले.