डंपरच्या धडकेत मोर्लेतील युवकाचा मृत्यू

डंपरच्या कागदपत्रांची पोलिसांनी निपक्षपणे तपासणी करण्याची मागणी

संगीत विशारद असलेल्या मोर्ले येथील युवकाचा डंपर चालकाच्या बेपर्वाईमुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१६) साटेली भेडशी येथे घडली. कुडासे तिठ्याच्या अलीकडे असलेल्या बंटी टोपले यांच्या क्रशरवर जाण्यासाठी डंपरचालकाने आपल्या ताब्यातील डंपर अचानक वळवला आणि दोडामार्गकडे दुचाकीने (जीए ०७ एए ५७३७) जाणाऱ्या प्रसाद तुकाराम कांबळे (वय -२८ वर्षे, रा.मोर्ले) यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला . यात दुचाकीचाही चक्काचूर झाला.
अपघात होताच कुडासे तिठ्यावर थांबलेल्या वाहतूक पोलिसांसह अनेकजण जमा झाले. त्यांनी जखमी प्रसादला खुर्चीत बसवण्याचा प्रयत्न केला,पण गंभीर जखमी असल्याने १०८ रुग्णवाहिकेची वाट न बघता शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी मदन राणे यांनी त्याला आपल्या मोटारीतून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथून त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
……

संगीत विशारद प्रसादची अकाली एक्झिट

प्रसाद हा संगीत विशारद होता.स्वतः गाणे शिकून तो इतरांनाही शिकवायचा.भजनात तो गायचा.वारकरी संप्रदाय, वारी यातही तो सहभागी व्हायचा.त्याचा मित्रपरिवार मोठा होता.त्याच्या अकाली जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.अपघात झाल्याचे कळताच मोर्लेतील अनेकांनी दोडामार्ग व बांबोळीत त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.त्याच्या मागे आई,वडील,दोन भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे.

……..

पूर्वी हा क्रशर बंटी टोपले यांच्या ताब्यात होता. आता तो ओंकार केसरकर चालवत आहे. शिरंगे येथून काळा दगड घेऊन हा डंपर क्रशरवर जात होता.भीषण अपघात झाल्यावर केसरकर याने आपल्या डंपर चालकाची बाजू घेत युवकाचीच चूक असल्याचा दावा केला आणि चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला.अपघातग्रस्त डंपर (जीए ०३टी ९१९२) ची कागदपत्रे नाहीत, टॅक्स,परमिट, पासिंग काहीही नाही, तसेच डंपरला इंडिकेटर सुद्धा नाहीत अशी चर्चा घटनास्थळावर सुरु होती.इंडिकेटर नसल्याने डंपर वळतो हे कळणे कठीण होते. त्यातही चालकाने समोरुन सरळ दोडामार्गकडे जाणाऱ्या प्रसादकडे दुर्लक्ष करून बेजबादारीने डंपर वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.अशा कागदपत्रे नसलेल्या गाड्या रस्त्यावर चालवून उलट युवकालाच दोषी धरले जात असल्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. तसेच अपघातग्रस्त डंपरची आणि कागदपत्रांची पोलिसांनी निःपक्ष तपासणी करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!