रक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे प्रतिपादन
कणकवली ची समाजाभिमुख शहर ओळख निर्माण करण्यात युवा संकल्प प्रतिष्ठान चेही योगदान
प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन
मागील सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठान जे खऱ्या अर्थाने सामाजिक जपली आहे. रस्ते अपघातात जखमींना तसेच काही आजारांमध्ये रुग्णांना तातडीची रक्ताची गरज भासते. तेव्हा आवश्यक रक्त उपलब्ध नसल्यास प्रसंगी रुग्णाचे प्राण जाऊ शकतात. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहितासाठी युवा संकल्प प्रतिष्ठान विधायक काम करत असल्याचे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांनी केले.
युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली च्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त महारक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, दिनदर्शिका प्रकाशन कणकवली कॉलेज च्या एच पी सी एल सभागृहात 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. जगताप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या अध्यक्ष प्रा.डॉ राजश्री साळुंखे, प्राचार्य डॉ युवराज महालिंगे, युवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद जाधव, सचिव संदीप चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुरेश पाटील, गद्रे नेत्र रुग्णालयाचे डॉ नरेंद्र तेली आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मारुती जगताप, प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. डॉ राजश्री साळुंखे म्हणाल्या की रक्तदानातून राष्ट्रीय एकात्मतेची मुळे युवा मनांत रुजवली जातात. कुठल्याही गावाची अथवा शहराची ओळख तिथे होणाऱ्या कार्यक्रमातून होते. युवा संकल्प प्रतिष्ठान ने सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत कणकवली शहराची समाजाभिमुख शहर अशी ओळख निर्माण करण्यात आपले योगदान दिले आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर आणि दिनदर्शिका प्रकाशनाने संस्थेने समाजाशी आपली नाळ आणखी घट्ट केली आहे.नववर्षाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या महामानावांची असलेली जयंती युवा पिढीला सुसंकल्प करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. विज्ञान कितीही पुढारले तरीही रक्ताला पर्याय बनवू शकले नाही. जेव्हा मानवी शरीराला रक्ताची गरज लागते तेव्हा रक्त हाच एकमेव पर्याय असतो. युवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष आंनद जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सलग 10 वर्षे युवा संकल्प प्रतिष्ठान समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी रक्तदान ,नेत्रतपासनी, आरोग्य शिबीर, युवाईसाठी कलाकौशल्य शिबीर निःस्वार्थी हेतूने आयोजित करत आहे. समाजातील जेष्ठांनी मार्गदर्शन करून नेहमीच या विधायक कामासाठी आम्हाला प्रोत्साहित केले. दरवर्षी 1 हजार दिनदर्शिकांचे कणकवली तालुक्यात घरोघरी मोफत वाटप संस्थेकडून करण्यात येते. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन होते. गरजू रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये अथवा घरपोच रक्तदान कार्ड देत युवा संकल्प प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जोपासत आहे . याहीपुढे रक्तदान सोबत समाजाभिमुख कार्य अखंड सुरू ठेवू.
प्राचार्य डॉ महालिंगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विधायक कृतिशील युवक आपल्या भारत देशाचे बलस्थान आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे वारस होऊन युवा संकल्प प्रतिष्ठान संस्था कार्यरत आहे. रक्तदान आरोग्य शिबीर सारखे कृतिशील जनहीताचे उपक्रम स्वयंस्फूर्ती ने राबवत संस्थेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी चे योगदान कृतीतून सिद्ध केले आहे. रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी दुर्मिळ बी निगेटिव्ह रक्तदाते असलेले पत्रकार राजन चव्हाण यांनी 29 वेळा आणि 100 वेळा रक्तदान केल्याबद्दल पराग गोगटे यांचा स्मृतिचिन्ह, शाल , श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संदीप चव्हाण ,सूत्रसंचालन महेंद्र चव्हाण यांनी केले. आभार महेंद्र चव्हाण यांनी मानले.