दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वा हितेश सावंत हिने पटकावले रौप्य पदक

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

       रांची येथे संपन्न झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राची २२ वर्षीय खेळाडू पूर्वा हितेश सावंत हिने महिलांच्या ट्रिपल जंपमध्ये १३.०३ मीटर उडी घेत रौप्य पदक पटकावले आहे. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्वा हिने श्रीलंकेच्या खेळाडूला मागे टाकत हे रौप्य पदक पटकाविले. आतापर्यंत तिने ट्रिपल जंप प्रकारात वैयक्तीत दोन आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत.या यशातून तिने भारत देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून माजी आमदार वैभव नाईक यांनीही तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

        कुडाळ तालुक्यातील भडगाव गावचे सुपुत्र उद्योजक हितेश सावंत यांची पूर्वा हि कन्या असून  मुंबईच्या सोमैया स्पोर्ट्स अॅकॅडमीशी संलग्न राहून तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.यावर्षीच्या दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक रौप्य पदक पटकाविणारी महाराष्ट्राची ती पहिली मुलगी ठरली आहे. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनने तिचे अभिनंदन केले आहे. पूर्वाच्या यशाने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्र राज्य सरकारने अशा खेळाडूंना पाठबळ देण्याची  मागणी होत आहे.

        याप्रसंगी पूर्वा म्हणाली, हे यश मिळविण्यासाठी मला माझे आई, वडील आणि माजी आमदार वैभव नाईक काका,तसेच कोच, अॅकॅडमीतील सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. हे पदक माझ्या मेहनतीचे फळ आहे.आपल्या भारत देशाला आणखी पदके मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत आणि त्यासाठी मी तयार आहे असे तिने सांगितले.
error: Content is protected !!