सिंधुदुर्गात रवींद्र फाटक यांचा चांगला संपर्क असल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीस होईल !

शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास
कुडाळ : आमदार रवींद्र फाटक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षक पदी वर्णी लागल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रवींद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांना येथील सर्व परिस्थितीची जाणीव आहे.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अनुभव आपल्या पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रवींद्र फाटक यांचा चांगला संपर्क असून याचाच फायदा पक्षाच्या वाढीस होईल एवढी ग्वाही आपण देतो, असे केसरकर म्हणाले.
आज सावंतवाडी आणि कणकवली येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होत असून सावंतवाडीतील मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्हाभरातून आमच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात आणखी भर पडेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून १३०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे कोकणचा कायापालट होण्यास नक्कीच मदत मिळेल.
मच्छीमार असो किंवा काजू बागायतदारांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून याचा फायदा स्थानिक लोकांनी घ्यावा. जेणेकरून उत्पन्नात भरघोस वाढ करता येईल, असेही केसरकर यावेळी म्हणाले.
माझ्याकडे शालेय शिक्षणमंत्री पद असल्याने कोकणातील तसेच राज्यातील सर्वच मुलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी निधी वाटप करण्यात आला असून मुलांना आवश्यक असणारा गणवेश सर्वांना देण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
ग्रामीण भागातील मुलांना गणवेश तसेच मोफत वह्या वाटप करण्यात येणार असून याद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे प्रगतीसाठी सरकार प्रयत्नशील राहील.
जिल्ह्यातील सर्व शाळा दुरुस्तीसाठी प्राधान्य देण्यात आले असून एकंदरीत
कोकणाला झुकता माप देणार हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ





