नितेश राणेंना राम, राम, गोट्या सावंतांना सलाम!

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या स्टेटस ने भाजपामध्ये खळबळ
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून कानडे नाराज?
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीकरिता भाजपाच्या तिकीट वाटपाची अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल चालू असताना कणकवली भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष व राणेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे संतोष उर्फ बुवा कानडे यांनी ठेवलेला स्टेटस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात व भाजपमध्ये खळबळ माजवणारा ठरला आहे. श्री. कानडे यांनी स्टेटस मध्ये नितेश राणेंना रामराम, गोट्या सावंतांना सलाम! अशा आशयाचा स्टेटस ठेवत पक्षांतर्गत नाराजी उघड केली आहे. त्यामुळे श्री. कानडे यांच्या या स्टेटस मुळे भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून, कानडे हे कासार्डे मतदार संघामधून जिल्हा परिषद साठी इच्छुक होते असे समजते. मात्र या ठिकाणी अन्य उमेदवाराच्या गळ्यात माळ पडल्याचे स्पष्ट होताच कानडे यांनी हे स्टेटस ठेवले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गोट्या सावंत यांना सलाम करत असताना भाजपा मध्ये कणकवली तालुक्यात झालेल्या तिकीट वाटपामध्ये गोट्या सावंत यांना झुकते माप दिल्याने त्यांचा यामध्ये संदर्भ दिला असल्याचेही भाजपच्या गोटामध्ये बोलले जात आहे. त्यामुळे या स्टेटस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.





