कोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक – आर्कि. दिनकर सामंत

आयआयएच्या रत्नसिंधू उपकेंद्राचा कुडाळमध्ये ”आरंभ”

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधील आर्किटेक्टस ची उपस्थिती

कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तूशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम झाले पाहिजे. त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. वास्तूविशारद म्हणून आपण त्याकडे पहिले पाहिजे. तरच कोकणचा शास्वत विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन सिडकोचे माजी मुख्य आर्किटेक्ट दिनकर सामंत यांनी केले. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस (IIA) रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राची सिंधुदुर्गमधील पहिली ‘आरंभ’ हि सभा आज कुडाळ मध्ये झाली. त्यासभेला संबोधित करताना दिनकर सामंत बोलत होते.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस (IIA) रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राचे उद्घाटन नुकतेच गेल्या २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे झाले. या केंद्राची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सभा “आरंभ” आज कुडाळमध्ये वासुदेवानंद हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेचा शुभारंभ दिनकर सामंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी IIA महाराष्ट्र चॅप्टर चेअरमन आर्कि. संदीप प्रभू, IIA रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचे मानद मार्गदर्शक आर्कि. संतोष तावडे, आर्कि. मकरंद केसरकर, आर्कि. गौरी सामंत, आर्कि. श्रेया इंदुलकर, कॉनबॅकचे संजीव करपे, क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनकर सामंत यांनी आपल्या मनोगतातून कोकणच कोकणपण टिकवून ठेवण्यावर भर दिला. कोकणात आरसीसी घरे, मंदिरे बांधण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. येथील संस्कृती टिकवून श्वाश्वत विकास झाला पाहिजे. इथली मंदिरे, येथील सडे टिकले पाहिजेत याकडे त्यांनी वास्तू विशारदांचे लक्ष वेधले. गणेश चतुर्थीच्या दरम्याने वास्तूविशारदांचे संमेलन घ्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
आर्कि. संदीप प्रभू यांनी आपल्या मनोगतातून आयआयए या १०८ वर्षे जुन्या संस्थे विषयी माहिती दिली. या जुन्या संस्थेशी रत्नसिंधूच्या माध्यमातून येथील वास्तू विशारद जोडेल गेले आहेत. त्यामुळे आपले प्रश्न, आपल्या समस्या मांडण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्याचा वापर करा असे आवाहन श्री. प्रभू यांनी केले. वास्तू विशारदांनी काम करताना एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करा. कोकणची संस्कृती जपा. येथील स्थानिक साहित्याचा बांधकामात वापर करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आर्कि. संतोष तावडे यांनी या पहिल्या सभेचे संयुक्तीक नाव सुचविणाऱ्या आर्कि. अभिषेक माने अभिनंदन केले. गेली १०८ वर्ष आयआयए हा हि संस्था वास्तुविशारदांसाठी काम करत आहे आणि ३० हजार पेक्षा जास्त आर्किटेक्ट या संस्थेचे सभासद आहेत हे अभिमानस्पद असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संस्थेचे उपकेंद्र सुरु होते आहे याचा आनंद असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आर्कि. मकरंद केसरकर यांनी या सबसेन्टरच्या मागची भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गशी निगडित १०७ आर्किटेक्टस आहेत. त्यातील ७० हे या दोन जिल्ह्यात काम करतात. काही लोक पुणे-मुंबई शहरात आहेत, पण ते मूळचे या दोन जिल्ह्यातील आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी कॉनबॅकचे संजीव कर्पे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि. अभिषेक माने आणि आर्कि. संजना शेट्ये यांनी केली. यावेळी आर्कि. शंकर सावंत, आर्कि. हर्षद सरवणकर, आर्कि. स्मिता बागवे, आर्कि. निलेश गुंडेचा यांच्यासह रत्नागिरी – सिंधुदुर्ग केंद्राचे पदाधिकारी, सभासद व रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वास्तुविशारद, सरकारी अधिकारी, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्रातील माननीय सदस्य व इतर निगडित क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.

error: Content is protected !!