गाव विकास समिती संघटना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार
ग्रामीण विकासाचे ध्येय साधणार
संघटनेच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय झाल्याची डॉ. कांगणे यांची माहिती
ब्युरो । देवरुख : ग्रामीण विकासाची धडपड असणाऱ्या गाव खेड्यातील सामान्य कुटुंबातील तरुण तरुणींना राजकीय व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे व खऱ्या अर्थाने त्या त्या भागातील ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास साधला जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गाव विकास समिती संघटना येणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढणार आहे.
याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या संघटनेच्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला.गाव विकास समितीच्या अकराव्या वर्धापनदिन निमित्त सदर कोअर कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही मतदारसंघात निवडणूक लढण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थतीत ही बैठक पार पडली.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राहुल यादव, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,सुरेंद्र काब्दुले,सुनिल खंडागळे,जिल्हा संघटक मनोज घुग,महिला अध्यक्षा दीक्षा खंडागळे-गिते, उपाध्यक्ष अनघा कांगणे, ईश्वरी यादव-सुर्वे या उपस्थित होत्या.
ग्रामीण भागाचा विकास मागील अनेक वर्षे रखडला आहे.गावा गावात विकास कामे केल्याचे भासवले जाते मात्र यामध्ये सामान्य जनतेचे हित किती प्रमाणात पाहिले जाते?काही ठिकाणी केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी झालेली कामे ही विकास कामे म्हणता येतील का?वाढते स्थलांतर, दळणवळण साधनांच्या नियोजनाचा अभाव,आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधा बाबत अनास्था यासर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नव्या विचारसरणीची तरुण पिढी राजकारण येणे गरजेचे आहे.राजकारण हेच आपल्या समस्या सोडविण्याचे प्रमुख माध्यम असल्याने आणि याच माध्यमातून आपले दैनंदिन प्रश्न सुटणार असल्याने गाव विकास समिती सर्व सामान्य कुटुंबातील विकासाचा दृष्टकोन असणाऱ्या तरुण तरुणींना संधी देणार असल्याची भूमिका या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ मंगेश कांगणे यांनी दिली.
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढणार असल्याचे गाव विकास समितीने निश्चित केल्याचे डॉ. कांगणे यांनी सांगितले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, देवरुख.