कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायतची टाळाटाळ

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांचा आरोप

कुडाळ : नगरपंचायतीच्या विदयमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांनी केला आहे. याबाबत संजय भोगटे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच याची प्रत नगरचनाकार-नगररचना कार्यालय, सिंधुदुर्ग, नगराध्यक्ष-कुडाळ नगरपंचायत आणि मुख्याधिकारी-कुडाळ नगरपंचायत यांना सादर केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्राचा जमीन वापर नकाशा तयार केलेला आहे. सदर जमीन वापर नकाशा तयार केल्यानंतर तो नागरिकांसाठी हकरती व सूचना घेण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेला होता. जमीन वापर नकाशा प्रसिध्द केल्यानंतर नगरपंचायत कुडाळकडे ५०० हुन अधिक हरकती व सूचना आलेल्या होत्या. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १६ अन्वये प्रादेशिक योजना तयार करताना व संमत करताना अनुसरावयाची कार्यरीती दिलेली आहे. कलम १६(३) मध्ये प्रादेशिक योजनेमुळे बाधित पोहोचलेल्या इसमाना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवीसंधी दिल्यानंतर सदरचा अहवाल प्रादेशिक मंडळाकडे सादर केला पाहिजे अशी तरतूद आहे. सदर नकाशा तयार करण्यासाठी सुमारे ९८ लाख रुपये संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत. सदरची रक्कम देऊनही २ वर्षे पूर्ण झालेली आहेत असे असतानाही सुनावणी घेण्यास विलंब व टाळाटाळ कशासाठी करण्यात येते याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांनी आपल्या अर्जात स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!