महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार

महिला दिनी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांचे प्रतिपादन

कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना महिला या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.
कुडाळ तालुका शिवसेना व हरित सिंधू सामाजिक संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा कार्यालय कुडाळ येथे  महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा जिल्हा महिला आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर व जेष्ठ महिला सुनीता शेंबडकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख बंटी तुळसकर, नीलम शिंदे, अनघा रांगणेकर, लुड्डीन फर्नांडिस, गीता नाटेकर, नीलम चव्हाण, जिया शेंबडकर, रिया कांबळी, वैष्णवी राणे, तारादेवी गडकरी, प्रणाली देवळी, वंदना पाटकर, अमृता मेस्त्री, समृद्धी मेस्त्री, तन्वी मेस्त्री, स्नेहा पाटकर, ममता झोरे, सौरवी चव्हाण,  प्रतीक्षा परब, आराध्या करलकर, पल्लवी कदम, आयुशी परब, सिद्धी शिरसाट, स्वप्नाली राणे,  पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात वाटचाल करताना त्या आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे. प्रत्येक स्त्री  आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे यासाठी निश्चितच प्रयत्न केला जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल. अलिकडेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी आला असून विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. पशुसखी, अंगणवाडीसेविका,  मदतनीस, महिला बचतगट, सामाजिक कार्यकर्त्या आदींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सानिका मुंडये, रिया कांबळे, सौरवी चव्हाण, सुनिता वरवडेकर, प्रतिभा परब, पल्लवी कदम, स्वप्नाली राणे, वैष्णवी राणे  या  सत्कारमूर्तींचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थ फाउंडेशनतर्फे मधुमेह व नशामुक्ती मार्गदर्शन सचिन राणे (सावंतवाडी) नारायण देसाई (वजराट) यांनी केले. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिस्कीट स्पर्धांमध्ये प्रतीक्षा परब, तन्वी मेस्त्री, प्रणाली देवळी, मेणबत्ती स्पर्धा प्रतीक्षा परब, सौरवी चव्हाण, रिया कांबळी चाळणीत माचीस कांडी टाकणे सानिका मुंडये, वैष्णवी राणे, आराध्या करलकर, उखाणा  सुनिता शेगाटकर, समृद्धी मेस्त्री यांनी यश संपादन केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रतिनिधी / कोकण नाऊ/ कुडाळ

error: Content is protected !!