कनेडी हायस्कूलमध्ये संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये प्रशाला तसेच संस्कृतभारती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत सप्ताह अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला श्री. मोहन सावंत माजी विस्तार अधिकारी, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृत सप्ताहात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामुहिक संस्कृत स्तोत्र पठण, संस्कृत पुस्तकांचे वाचन, संस्कृत पुस्तक प्रदर्शन इ. कार्यक्रमांचा यात समावेश होता.
संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीन भाषा आहे तसेच ती अतिशय मधुर भाषा आहे. संस्कृत आहे तर भारतीय संस्कृती आहे. एक परिपूर्ण भाषा म्हणून तिला ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी संस्कृत स्तोत्रे, संभाषण, समूहगीते, वैयक्तिक गीते, कथाकथन, नृत्य इ. चे संस्कृत मधून अतिशय सुंदर सादरीकरण केले व उपस्थित प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. या प्रसंगी संस्कृत शिष्यवृत्ती प्राप्त कु मैत्रेयी आपटे (इ. १० वी) हिचा सत्कार करण्यात आला. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आयोजित संस्कृतभाषाप्रारम्भः परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करत विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु. मीरा मकरंद आपटे व कु. पूर्वी महाबळेश्वर देसाई या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे संस्कृताध्यापक तसेच संस्कृतभारती सिंधुदुर्ग चे जिल्हा प्रचारप्रमुख श्री. मकरंद आपटे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मैत्रेयी आपटे हिने केले. आभार कु. तन्वी हर्णे हिने मानले.