आचरा डोंगरे वाडी येथे रान डुकराने केले छप्पराचे नुकसान

आचरा डोंगरे वाडी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास डगरीवरुन जाणा-या रान डुकराचा अंदाज चुकल्याने
शंकर उर्फ बाबा देसाई यांच्या घरावर उडी मारल्याने छप्पराचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने घराला पोट माळा असल्याने घरातील मंडळींना कोणतीही इजा झाली नाही. मात्र रानडुकराची हि करामत चर्चेचा विषय बनली आहे.
आचरा डोंगरे वाडी हि एका बाजूने डोंगराच्या कुशीत तर दुस-याबाजूला विस्तिर्ण पाणथळ मळा अशा भागात वसली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी डोंगरभागातून वन्य प्राणी उतरत असतात. सोमवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास डोंगरावरुन मळे भागाकडे जाणा-या रानडुकराचा अंदाज चुकल्याने डगरीलगतच्या देसाई यांच्या बंद घराच्या छप्परावरुन चालतच लगतच्या रामेश्वर देवस्थानचे कारकून असलेल्या बाबा देसाई यांच्या घराच्या छप्परावरुन चालत उडी मारुन पसार झाला. पहाटेच्या साखर झोपेच्या वेळी आकस्मित कौले तुटून पोटमाळ्यावर पडण्याचा आवाज येवू लागल्याने घाबरलेल्या देसाई कुटूंबाने बाहेर धाव घेतली. छप्परावर रानडुकराची स्वारी बघून आरडाओरडा केल्यावर उडी मारतच डुक्कर मळे भागाकडे पळून गेला. आकस्मिक घडलेल्या या प्रसंगाची सोमवारी डोंगरे वाडी सह आचरेगावात मात्र चर्चा रंगली होती. वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीकडे आक्रमण वाढत चालले आहे. मात्र कौलावरुन डुकराच्या प्रवासाची घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करुन गेली.




