शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे “सामान्य मानसिक आरोग्य” विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे “संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग” यांच्यावतीने सामान्य मानसिक आरोग्य या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग चे श्री. अजय साठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन सामान्य मानसिक आरोग्य बद्दल मार्गदर्शन केले. शेठ न. म . विद्यालय खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी गेली 17 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे श्री. अजय साठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालक आणि शिक्षकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित श्री. अजय साठे यांचे प्रशालेच्या वतीने श्री. संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मानसिक आरोग्याची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे, तर भावनिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे होय.
कार्यशाळेदरम्यान ताणतणावाची कारणे, नैराश्याची लक्षणे, परीक्षेचा ताण, मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक, कौटुंबिक संवादाचा अभाव, स्पर्धेचे दडपण अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ताणतणाव कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, ध्यानधारणा, वेळेचे योग्य नियोजन, सकारात्मक विचारसरणी आणि छंद जोपासण्याचे महत्त्व यावर श्री. साठे सर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका व प्रश्न मोकळेपणाने मांडले. काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण, करिअरची चिंता व आत्मविश्वासाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी संयमपूर्वक त्यांची उत्तरे देत प्रेरणादायी उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. “समस्या सांगणे ही कमजोरी नसून ती धैर्याची खूण आहे,” असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष रोटरियन श्री. दयानंद कोकाटे, श्री. अजय गुरसाळे, श्री. सुबोध देसाई श्री. गुरव सर, करांडे सर, गुरखे सर आदी मान्यवर उपस्थित होते.





