वारगाव माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नुतनीकरण केलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन ; माजी विद्यार्थ्यांचा केला सन्मान

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगावच्या माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. स्व. महादेवशेठ वि. केसरकर पुण्यतिथी कार्यक्रम आणि शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात हा कार्यक्रम पार पडला.

या स्वच्छतागृहाचे उद्घाटन उपस्थित माजी विद्यार्थी सुधीर शेट्ये, महेंद्र केसरकर, राजू पांचाळ, नाना शेट्ये, महेश प्रभू, शैलेश कोकाटे, दिलीप नावळे आणि विकास कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक विजय पांचाळ, संस्था अध्यक्ष विजय केसरकर, मुख्याध्यापक हनुमंत वाळके, माजी विद्यार्थी संघ प्रमुख सुधीर शेट्ये, तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. या स्वच्छता गृहाच्या कामामुळे असंख्य विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विद्यालयाच्या दुरुस्तीसाठी ₹1 लाख विकासनिधी, शाळेत CCTV संच बसविणे, दरवर्षी दहावीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार व करिअर मार्गदर्शन पुस्तिका / रोप भेट, निवृत्त शिक्षकांचा सन्मान, गुरूवंदन कार्यक्रमांतर्गत सन्मानपत्र, कोविड काळात विद्यालयासाठी ऑक्सीमीटर व तापमापक यंत्रासह वैद्यकीय साहित्य, तसेच विद्यार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना गरजेनुसार मदत या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहन, शाळेच्या परिसरात वृक्षारोपण, ग्रंथालयासाठी पुस्तकांचे योगदान, तसेच शाळेच्या व्हरांड्याचे सुशोभीकरण, दुरुस्तीकरण आणि लादीकरणाचे काम ही महत्त्वपूर्ण कामेही करण्यात आली आहेत.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक विजय पांचाळ यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या सातत्यपूर्ण कार्याची प्रशंसा करत शाळेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीत या उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात संस्थेमार्फत उपस्थित माजी विद्यार्थ्यांना शाळेला करत असलेल्या मदतीबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!