सिंधुदुर्गातील जलजीवन मिशनच्या कामाबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

आमदार वैभव नाईक यांनी केली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गातील 80 टक्के हुन अधिक कामे अपूर्ण अवस्थेत

     जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक गावांना पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्याकरिता अनेक कामे हाती घेण्यात आली होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी 80 टक्के कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांची यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत मोठी गैरसोय निर्माण होत आहे. जलजीवन मिशनच्या सर्व कामांमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर कामे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सभागृहामध्ये भेट घेतली. 
     पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. व जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे मार्गी लागण्याकरिता लवकरात लवकर या कामांची आढावा बैठक घेण्यात यावी. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच  कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांना या सर्व कामाच्या सद्यस्थितीबाबत इत्यंभूत माहिती घेऊन उपस्थित राहण्याबाबतचे आदेश देण्यात यावेत अशी आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे मंत्री यांच्याकडे मागणी केली.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!