कणकवली तालुक्यात अंगावर वार करत खून केल्याची घटना

कणकवली तालुक्यात एकच खळबळ
पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू
कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथील गणपतीसाणा परिसरात गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाच्या शरीरावर अनेक धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या असून, अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे, हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल अरविंद जाधव हे कणकवली आदी उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार किरण देसाई आणि ज्ञानेश्वर तवटे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे तसेच हत्येमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने साळीस्ते परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.





