पोलीसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात द्या!

आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत केली मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत वेधले वनमंत्र्यांचे लक्ष
हिवाळी अधिवेशना दरम्यान वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढाव्या बाबत वनमंत्र्यांसोबत बैठक
पावसाळी अधिवेशना दरम्यान विधान भवन मुंबई येथे वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढावाबाबत वनमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वन विभाग, प्रधान सचिव मा. वेणूगोपाल रेड्डी हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. माकडांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश मा. प्रधान सचिव, वेणूगोपाल रेड्डी यांना दिले.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदूकांबाबत देखील आमदार वैभव नाईक यांनी मा. वनमंत्री यांना विचारणा केली. सदर शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात देण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मा. मंत्री महोदयांना मा. गृहमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली. सदर बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. तसेच या बैठकीला आमदार वैभव नाईक यांना देखील उपस्थित राहण्याबाबत पत्र द्या अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या. या बंदुका वारसांच्या ताब्यात दिल्यास वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. गैरवापर झाल्यास कायदेशीर कारवाई होते. मात्र वारसांच्या ताब्यात या बंदुका दिल्यास पोलीस प्रशासनावरील या बंदुका सांभाळण्याचा ताण देखील कमी होऊ शकतो. व वन्यप्राण्यांना हुसकावून लावल्यावर शेतीचे होणारे नुकसान देखील कमी होते. असे श्री नाईक यांनी यावेळी सांगितले.
दिगंबर वालावलकर /कणकवली