अल्पवयीन मुलीवर अत्याचार व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
अल्पवयीन युवतीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैभववाडी तालुक्यातील सचिन सुरेश आग्रे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सन २०२१ मध्ये कॉलेजला जाण्यासाठी आरोपीच्या प्रवासी वाहनातून प्रवास करताना निर्माण झालेल्या ओळखीतून आरोपीने अल्पवयीन युवतीशी जवळीक निर्माण केली. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले तसेच साशेल मिडीयाद्वारे चॅटींगही होऊ लागले. दरम्यान, कालावधीत प्रेमसंबंधांचा फायदा घेत तीच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना याबाबत कल्पना येताच युवतीच्या पालकांनी आरोपीकडे रितसर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, जात व वयातील अंतराचे कारणे देत नकार देण्यात आला. तरीही दोघांमध्ये बोलणे चालू होते.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे पूर्वीच्या फोटो व व्हिडीओची मागणी केली असता त्याला तीने नकार दिला. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाले. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही बाब फिर्यादीने आपल्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर नातेवाईक गावी येताच फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार भादंवि कलम ३७६, ३७६ (२), (एन) ३५४, अ. ब. क. ५०६ आणि बालकांचे लैंगिक गुन्हयातून संरक्षण कायदा कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आरोपी एप्रिल २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्या जामिनावर झालेल्या सुनावणीत ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करताना फिर्यादीच्या गावी जाऊ नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये आदी अटी घालण्यात आल्या आहे.
कणकवली प्रतिनिधी