“माझा मोबाईल नॉटरीचेबल, गैरसमज करून घेऊ नका, दादा आता निवडून आले आहेत!

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा “स्टेटस” राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

या स्टेटसचा रोख नेमका कुणावर? याची दबक्या आवाजात चर्चा

केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे काल लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विजयी झाल्यानंतर त्यांचा जल्लोष काल साजरा करण्यात आला. मात्र हा जल्लोष झाल्यानंतर आता या मतदारसंघात काही ठिकाणी राणेंना लीड मिळालेले नाही किंवा ज्या ठिकाणी राणेंपेक्षा प्रतिस्पर्धी उमेदवार विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले याची आता कुजबुज सुरू होऊ लागली आहे. व या सगळ्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षातील काहींना सूचक इशारा देणारे व्हाट्सअप स्टेटस देखील आता व्हायरल होऊ लागली आहेत. “मी माझा मोबाईल नॉट रीचेबल ठेवणार आहे, कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये, दादा आता निवडून आले आहेत!” अशा आशयाचे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेवलेले स्टेटस सध्या चर्चेचा विषय बनले आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची नावे चर्चेत होती. ही नावे निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आली नसली तरी आता अशा प्रकारच्या स्टेटसच्या माध्यमातून अशा लोकांना हा सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. हे व्हाट्सअप स्टेटस कुणाला उद्देशून आहे हे “सुज्ञाण्यास सांगणे न लगे” अशी काहीशी स्थिती आहे. त्यामुळे कणकवलीच्या माजी नगराध्यक्षांनी निवडणूक निकालानंतर टाकलेला खडा हा येत्या काळात महत्त्वाचा असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!