भंडारी प्राथमिक शाळेच्या रंगमंचाचे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या हस्ते उदघाटन
मालवण : ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत घडलो त्या शाळेमध्ये एका रंगमंचाचे उदघाटन करण्यासाठी मला बोलाविले हे माझे मी भाग्य समजतो. अभ्यासा बरोबरच मुलांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणारी शाळा म्हणून भंडारी हायस्कुलकडे पाहिले जाते. या रंगमंचावर वावरणारी चिमूरडी मुले उद्याची भावी कलाकार म्हणून समाजासमोर येतील आणि मालवणच्या नाव लौकिकात भर घालतील असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी अरविंद म्हापणकर यांनी येथे केले.
येथील भंडारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात नव्याने तयार करण्यात आलेल्या रंगमंचाचे उदघाटन भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि साहित्यिक अरविंद म्हपणकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे उपाध्यक्ष बी. जी. गोलतकर, कॉन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, अभिमन्यू कवठणकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सदानंद मालवणकर, डॉ. सुभाष दिघे, लोकल कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर, जॉन नरोना, हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, शशिकांत मयेकर, दिलीप मेस्त्री, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कांबळी, प्रा. पवन बांदेकर, प्रकाश कुशे, प्रफुल्ल देसाई, किशोर मळेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कांबळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सहाय्यक शिक्षिका राधा दिघे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी श्री. म्हापणकर यांनी शालेय जीवनातील रंगमंचावरील आठवणी सांगून रंगमंचावर काम करता करता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना आपल्याच शाळेच्या रंगमंचाचे उदघाटन करण्याचे भाग्य लाभले. आयुष्यात नाटक उभे करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. श्रम घेतले आणि त्यामुळेच मला शाळेने या रंगमंचाच्या उदघाटनासाठी बोलावले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी या रंगमंचाच्या उभारणीसाठी शाम नाईक यांनी तसेच प्रकाश योजनेसाठी मुंबईच्या महेश नागवेकर यांनी देणगी दिल्याने या प्रशालेतील लहान मुले आपले कलागुण सादर करतील असे सांगितले.
शिक्षक भूपेश गोसावी यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधा दिघे, महेश लोकेगावकर, पूर्वी गोवेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.