“एटीएस” पथकाची थेट जल जीवन मिशनच्या विहिरीवर धडक
कणकवली तालुक्यातील घटनेमुळे एकच खळबळ
या पथकाचा मूळ उद्देश साध्य होतोय का?
पोलीस अधीक्षक, सीईओ, जिल्हाधिकारी लक्ष देणार का?
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात कामे सुरू झालेली असताना या कामांमध्ये विहिरीची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी विहिरींची कामे करत असताना भूगर्भात लागलेले खडक फोडण्याकरिता सुरुंग लावले जातात. व हे सुरुंग लावण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या जिलेटिन बाळगण्याच्या परवाना व अन्य कायदेशीर बाबींची तपासणी करण्यासाठी (“एटीएस”) दहशतवाद विरोधी पथक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती हाती आली आहे. कणकवली तालुक्यातील नुकत्याच एका गावातील जल जीवन मिशनच्या विहिरीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी या पथकाने दुपारी अचानक भेट दिली. व विहिरीची खोदाई सुरू असताना या ठिकाणी चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान त्या विहीर खोदाई करणाऱ्या संबंधितांकडील जिलेटीनच्या कांड्या ही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या दरम्यान सदर स्फोटके बाळगण्यासाठी परवाना आहे का? यासह अन्य चौकशी करत असताना संबंधितांकडील परवान्याची ही खातरजमा केली व उर्वरित कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना दिल्याचे समजते. याच दरम्यान या दहशतवाद विरोधी पथकाच्या एका सावंत नामक कर्मचाऱ्याकडे या कारवाईबाबत चौकशी केली असता त्यांनी आम्ही मुबंई येथून आलो, असे सांगितले. मात्र तुमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख कोण? कार्यालय कुठे याबाबत विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथका चे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबई कार्यालयाकडून चार कर्मचारी सिंधुदुर्गासाठी देण्यात आले आहेत व हे कर्मचारी अशी अचानक तपासणी करू शकतात. अशी माहिती दिली. मात्र दहशतवाद विरोधी पथकाचा गावच्या विकास कामामधील एक घटक असलेल्या व ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या कामाच्या ठिकाणी आकस्मित भेटी देऊन तपासणी करणे हा उद्देश आहे का? नेमके या पथकाकडून शासनाला अजून काही वेगळी कारवाई अपेक्षित आहे? ज्या उद्देशाने ही पथके कार्यरत करण्यात आली तो उद्देश निश्चितपणे साध्य होतोय का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. अशा वेळी या प्रत्येक विहिरीच्या खोदाईच्या ठिकाणी हे पथक चौकशी करणार का? तसेच अशा प्रकारे विहिरी च्या खोदाईच्या ठिकाणी जाऊन सदर पथक कारवाईचा फार्स दाखवण्यापेक्षा जर संबंधित जिलेटीन परवानाधारकाकडे सदर जिलेटिन किंवा त्यासाठी आवश्यक स्फोटक बाळगण्याचा परवाना नसेल किंवा अधिकार नसेल तर त्यांच्यावर अन्य ठिकाणी किंवा ते सदर साठा करत असलेल्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करणे संयुक्ती ठरले असते. परंतु जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथक जर विहिरींच्या कामांवर व्हिजिट करायला लागले तर जलजीवन मिशनची कामे या अशा कारवाईच्या ससेमिऱ्याने वेळेत पुरी होतील का? याचा विचार आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी करण्याची गरज आहे. दरम्यान कणकवली तालुक्यातील ज्या विहिरीच्या कामाच्या ठिकाणी संबंधित दहशतवाद विरोधी पथकाने तपासणी करिता भेट दिली त्यावेळी त्या पथकाच्या सावंत नामक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू आहे. असे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर काही वेळातच सदर पथक अन्य कागदपत्र घेऊन आम्हाला भेटा असे सांगून तिथून गेल्याचेही समजते. त्यामुळे नेमक्या या कारवाई मागे गौडबंगाल काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विहिरी खोदाई केल्याने दहशतवादी कारवाया वाढीला लागतात किंवा त्या जिल्ह्यात यामुळे सुरू होतात असा जर या पथकाचा समज असेल तर याचा देखील या पथकाने विचार करण्याची गरज आहे. पथकाच्या या स्फोटक पदार्थांच्या साठा किंवा बाळगण्याबाबत चौकशी करण्याला कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. कारण या पथकाचा तो अधिकार असेल ही. मात्र ज्या पद्धतीने चौकशीचा फार्स संबंधित विहिरीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन केला जातो हे शासनाच्या योजना यशस्वी होण्यासाठी योग्य आहे का? हे देखील पाहणे व याचा जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. व अशा प्रकारे विहिरींच्या कामे करणाऱ्या संबंधितांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद विरोधी कारवाया केल्याचे एखादे उदाहरण समोर आले असेल तर ते माध्यमा पर्यंत देखील या विभागाने पोहोचवण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांच्या अशा कारवाईने पुढील संभाव्य घडणाऱ्या प्रकारांना आळा बसेल.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली