आजगाव साहित्य कट्ट्यावर गीतरामायणावर चर्चा !

सावंतवाडी प्रतिनिधि गीत रामायण हे बाबूजींच्या गायनाने आणि संगीताने घरोघरी पोहोचले; त्याचप्रमाणे गदिमांचे शब्दही घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे.यमक,उपमा,उत्प्रेक्षा,अतिशयोक्ती अशा अनेक अलंकारानी गीतरामायणातील गीते नटलेली आहेत.या शब्दसौंदर्याकडे लक्ष वेधण्यासाठी आजगाव येथील साहित्य कट्ट्यावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे”, असे उद्गार साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. निमित्त होते साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ४२ व्या मासिक कार्यक्रमाचे. आजगाव मराठी शाळेत झालेल्या ‘गीतरामायणातील शब्द सौंदर्य ‘या कार्यक्रमात ते पुढे म्हणाले, “गीतरामायणातील गीतात यमकांची लयलूट आहे. ‘अयोध्या मनुनिर्मित नगरी’ मधील नगरी घरी अंतरी, वसंत सरला तरी, सूर्य जसा संगरी, छळीते अभ्यंतरी; ‘स्वयें श्रीरामप्रभू’ मधील आकारती,झंकारती,पाणावती अश्या यमकांविषयी बोलतानाच त्यानी अन्य शब्द सौंदर्यही उलगडून दाखवले. राम जन्मला ग सखे मधील ‘पेंगुळल्या आतपात’ हे कडवे; सावळा ग रामचंद्र मधील ‘झालो बोबडे आपण’; स्वयंवर झाले सीतेचे मधील ‘आकाशाचे जडले नाते ऐसे धरणीचे’ अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली. निरोप कसला माझा घेता या गीतामधील ‘जेथे राघव तेथे सीता’ या ओळीचे एका म्हणीत रुपांतर झाल्याचे ते म्हणाले. तसेच नकोस नौके मधील ‘तारक त्याला तारुन नेऊ पदस्पर्शाने सर्व तरू’ किंवा ‘भाग्य आपले आपल्या हाती अपुल्यापासून दूर करू’ ही उदाहरणेही त्यांनी दिली.
यानंतर सोमा गावडे यानी स्वये श्री रामप्रभू ऐकती या गीतातील सौंदर्य उलगडून दाखवले व काही कडवी स्वतः गायली. त्यानंतर विनायक उमर्ये यांनी ‘गा बाळांनो श्रीरामायण’ या गीतातील शेवटच्या कडव्याबद्दल सांगितले. काहीही न स्विकारता रामकथेचे निरुपण करणे असे वाल्मिकींना अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. भालचंद्र दिक्षित यांनी कुंभकर्णाला देखील आपले ह्रदगत सांगण्यासाठी ‘योग्य समयी जागविले मला’ असे गीत आहे, परंतु रावणाला गीत नाही,असे का? अशी शंका उपस्थित केली. त्यानंतर गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम केलेले शेखर पणशीकर बोलले. त्यांनी आपले अनुभव सांगितले, गीतातले सौंदर्य सांगितले, ‘उदास का तू’ या गीताचे विश्लेषण केले. गदिमांनी दशरथाच्या चार पुत्रांची चार वेदांशी घातलेली सांगड उलगडून दाखवली. अहल्या आणि शबरी यांच्या गीतांवरही भाष्य केले.शेवटी त्यांनी गायलेल्या गीतरामायणातील भैरवीगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला सरोज रेडकर,अनिता सौदागर आणि एकनाथ शेटकर हे ही उपस्थित होते.

error: Content is protected !!