कणकवलीतील सुसज्ज क्रीडा संकुलाचे येत्या दहा दिवसात लोकार्पण

स्टार महापुरुष मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी नगराध्यक्षांची माहिती
शहरातील मंडळांना स्पर्धा भरवण्यासाठी जागा मिळणार मोफत
कणकवली : शहरातील खेळाडूंना खेळाची प्रॅक्टिस करता यावी यासाठी कणकवली न.पं.ने क्रीडासंकुल उभारले आहे. या संकुलाचे येत्या 8 ते 10 दिवसांत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. कीडा संकुलाच्या परिसरात कायस्वरुपी अंडर आर्म क्रिकेट, हाॅलीबाॅल, बास्केट बाॅल यासारखे खेळ खेळता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील कोणत्याही मंडळाला विनामुल्य स्पर्धा भरविण्यासाठी याठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
येथील क्रीडासंकुलाच्या जागेत स्टार महापुरुष मित्रमंडळातर्फे डे-नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, बांधकाम सभापती तथा नगरसेवक अँड. विराज भोसले, सामाजिक कार्यकर्ते मेहुल धुमाळे, उद्योजक राजू मानकर, माजी नगरसेवक अजय उर्फ बंडू गांगण, प्रसाद अंधारी, सुशील पारकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, आयोजक प्रथमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. नलावडे म्हणाले, स्टार महापुरुष मित्रमंडळाचे कार्यकर्ते नेहमीच आपल्या सोबत राहिले आहेत. या मंडळातर्फे आयोजित केली जाणारी सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा असो, त्यानिमित्त होणारे कार्यक्रमांचा शुभारंभ माझ्या हस्ते होत असते, ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मंडळाचे सामाजिक उपक्रम हे इतरांसाठी अनुकरणीय असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील चांगले खेळाडू तयार होतील. कणकवली डेव्हलप होत असताना खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे न. पं. ची जबाबदारी असून त्या पूर्ण करण्याचे काम मी व माझी टीम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांना राजकीय मैत्रीवरून चिमटा काढला. त्यामुळे व्यासपीठावर एकच हाशा पिकला.
मेहुल धुमाळे म्हणाले, स्टार महापुरुष मित्रमंडळातर्फे क्रिकेट स्पर्धा भरविण्याचा उपक्रम स्तुत्य असून मंडळाचे तरुण सदस्य ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे काम करीत असून मंडळाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे कौतूकउदगार त्यांनी काढले. आरंभी मान्यवरांचा मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटनंतर पहिला सामना शांतिदूत विरुद्ध कोहिनूर लायन्स यांच्यात झाला. यात कोहिनूर संघाने शांतिदूत संघाचा पराभव केला. या स्पर्धेत निमंत्रित ८ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रात्री होणार आहे. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गिरीश चव्हाण, रोहित चव्हाण, दीपिकेश सदडेकर,सूभा घाडीगावकर,शिवाजी भिसे,प्रदीप चव्हाण, ओंकार सुतार,प्रसाद चव्हाण,राकेश चव्हाण,उमेश आयरे,नागेश सुर्यवंशी,मनीष वंजारे,अवधूत राणे,नारायण भिसे,दर्पण वणगे यांच्यासह मंडळाचे सदस्य मेहनत घेत आहेत.
कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी