राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ प्रथम

गावडोबा कलेश्वर राईचीवाडी व्दितीय ;गजानन भजन मंडळ, नेरूर तृतीय
कै.सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्वर राईचीवाडी – या संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर- कुडाळ संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचा शुभारंभ मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश सापळे व वारकरी विलास बीडये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार मंदार सापळे, निलेश धडाम,राजू मानकर, उदय मुंज,साई अंधारी, सौरभ पारकर,महेंद्र सांबरेकर मुकुंद खानोलकर, बाळा सापळे,काशिनाथ कसालकर गुरुजी, महेंद्र अंधारी,बंड्या पारकर, दादा मुंज, हरिष उचले,हर्षल अंधारी,संदीप अंधारी,प्रद्युम मुंज, चेतन अंधारी,सोहम वाळके, प्रज्वल वर्दंम,संजय मालंडकर,स्वप्नील मेनकुदळे, रुद्र सापळे,नाना सापळे,चेतन मुंज, दत्ता तोरसकर आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले.
खो… खो… खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा…. सण हा होळीचा…. खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी टिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या अप्रतिम सादरीकरणाने नागरिक भारावून गेले. शिमगोत्सवानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित केलेली राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा कणकवलीकरांसाठी अविस्मरणीय ठरली.
राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य दिव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्कारांचे एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण करण्यात आले. गौळण व भारूडांवर या सर्व संघातील कलाकारांनी कलाविष्कराचे अप्रतिम सादरीकरण केले. बाजरपेठ, झेंडा चौकातील मांड उत्सवात हलत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्करांचा सोहळा नेत्रदीपक ठरला. याशिवाय सोंगांचा कार्यक्रम उत्तरोतर रंगतदार ठरला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले
गेले पाच दिवस शहरातील झेंडा चौकात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी शहरात रंगपंचमी साजरी करत आनंद लुटला रात्रौ मांडावर श्रीकृष्ण रूपासह गाऱ्हाणी, लळीतासह पारंपारिक सोंग आदी कार्यक्रम पार पडले. यानंतर मांडउत्सवाची धुळवडीने सांगता झाली.
कणकवली प्रतिनिधी