सामान्यातील असामान्य संजयजी घोडावत
“सुशीलेच्या सुसंस्कारातून घडला,
दानचंदांची दानशूरता शिकला,
नीतिमत्तेची नीताभाभीची साथ सोबतीला,
मग कोणत्याही पराजयाची भीती संजयजीना कशाला?”
संजयजी दानचंदजी घोडावत नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात जय म्हणजेच यश प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व. यशस्वी, प्रतिभाशाली, तत्वनिष्ठ, दानशूर, उद्योजक, शिक्षणातील दीपस्तंभ, पायलट, अशा अनेक बिरुदावलींनी सुपरिचित असणारे हे व्यक्तिमत्व.
दिडवाना राजस्थान येथील त्यांचे मूळ घराणे असले तरी व्यवसायाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रात आले आणि कायमचेच मराठी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे दानचंदजी घोडावत व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. दि २८ फेब्रुवारी १९६५ रोजी सुशीला व दानचंद यांच्या पोटी संजय नावाचे कर्तृत्ववान रत्न जन्मले. एकदम सुसंस्कृत, प्रतिभाशाली अशा जैन समाजात जन्मलेल्या संजयजींना माता-पित्यांकडून संस्काराचा ठेवा मिळाला. संजयजींचे बालपण जयसिंगपूरातच गेले. शालेय शिक्षण जयसिंगपूरमधील जयसिंगपूर हायस्कूलमध्ये झाले.
‘स्वप्ने नेहमी मोठी पहावीत. ती स्वप्ने सत्यात उतरवण्याची स्वतःत धमक निर्माण करावी.’ हा विचार जोपासतच लहानपणी आभाळातून घरघर करत जाणारे विमान किंवा अगदी जवळून जाणारे हेलिकॉप्टर पाहून संजयजी आनंदीत व्हायचे. त्यांच्या चमकणाऱ्या डोळ्यात उदयाचे भव्य-दिव्य आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न असायचे.
वडीलांचा व्यवसाय जेमतेम चालला होता. संजयजींचे दोन्ही भाऊ वडिलांना त्यांच्याच व्यवसायात मदत करत होते. पण आपण स्वतः काहीतरी वेगळे करायचे हे स्वप्न उराशी बाळगल्यामुळे संजयजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन स्वतःचा ‘अॅल्युमिनिअमच्या शिटस’ बनवण्याचा पहिला व्यवसाय १९८८ साली सुरु केला. स्वतः चे नशीब त्यांना आजमावयाचे होते. नशीबाला कष्टाचीही साथ होतीच पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. दुर्दैवाने हा व्यवसाय तोट्यात गेला. पण खूप काही अनुभवाची शिदोरी त्यांना मिळाली. संजयजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पहिल्या प्रयत्नात कधीच यश प्राप्त झाले नाही तर अपयशातून यशाकडे त्यांची वाटचाल नेहमीच राहिली आहे.
पुढे वडिलांच्याच व्यवसायात ते रमू लागले. पण मन स्वस्थ बसत नव्हते. भविष्यकाळ खुणावू लागला होता. अवघ्या दोन लाख रुपयांचे भांडवल आणि दोन लोकांना सोबत घेऊन नवीन उद्योग १९९३ साली ‘घोडावत इंडस्ट्रीज’ या नावाने सुरु केला. स्वतः गावोगावी फिरून कन्झ्युमर प्रोडक्ट मार्केटिंगचे काम संजयजींनी केले. सुरुवातीला कोल्हापूरच्या खेडयापाड्यात स्कूटरवरून फिरणारा हा माणूस भविष्यात हेलिकॉप्टरमधून फिरेल असे भविष्य जरी कोणी सांगितले असते तरी त्यावरही कोणी विश्वास ठेवला नसता. पण संजयजींकडे असणा-या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम या त्रिसुत्रीमुळे त्यांनी उदयोग क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमठवला. पाहता आणि पाहता पाहता ते ‘स्टार’ बनले.
सन १९९७ साली स्टार ऑक्सेकेमची स्थापना केली. ही भारतातील सर्वात मोठी ऑक्सेलिक अॅसिड उत्पादन क्षमता असणारी कंपनी आहे. युरोप, आशिया, युएसए व ब्राझीलसह जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये याची निर्यात होते. सन २००५ सालापासून ‘स्टार लाईन’ या ब्रँडखाली घोडावत टेक्सस्टाईलमध्ये कॉटन, लायक्रा, लिनन, प्लेन, ड्रील यामध्ये विविध प्रकारचे कापड तयार केले जात आहे. सन २०११ साली घोडावत मायनिंग म्हणजेच खाणकाम उद्योग सुरू केला, त्या माध्यमातून उच्च दर्जाचे मार्बल पुरवठा करू लागले. कृषी आणि फलोत्पादन व्यवसायातही मोठी कामगिरी केली. मोठ्या प्रमाणात विविध फुले, फळे, भाज्या परदेशात निर्यात होऊ लागल्या.
प्रचंड आत्मविश्वास, नाविण्याची आवड, प्रयोगशीलता यामुळे एकाच उद्योग क्षेत्रात न राहता त्यांनी कन्झ्युमर प्रोडक्ट यामध्ये स्टार खाद्यतेल, स्टार मीठ, स्टार राईस, स्टार आटा, स्टार सुजी, स्टार रवा, स्टार मैदा, स्टार जॅगरी, स्टार वॉटर, स्टार नमकीन यामध्ये (कुरकुरे, चिप्स, टीबीएच, सोयास्टिक्स) व शीतपेये यामध्ये (फिझिंगा, फ्रुस्टार, कुलबर्ग, फ्लेवर्ड मिल्क) अशी अनेक उत्पादने त्यांनी सुरु केली. व्यवसायाला एकाच ठिकाणी केंद्रित न करता विविध प्रकारच्या उद्योग क्षेत्रात विस्तार करणे योग्य असते हे ओळखून संजयजीनी २०१५ साली नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून ‘रेनोम एनर्जी सर्व्हिसेस’ या माध्यमातून भारतातील पहिली विंड टर्बाइनचे व्यवस्थापन करणारी कंपनी सुरु केली. तत्पूर्वी २००५ श्रेणिक इंडस्ट्रीज विंड ऑपरेट टर्बाइनसाठी डिझाईन केलेले स्टील ट्यूबलर टॉवर्सचे उत्पादन सुरु केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात या ठिकाणी पवनचक्क्या उभ्या केल्या. २०१८ साली ‘घोडावत सॉफ्टटेक’ ही आयटी क्षेत्रात काम करणारी संस्थाही सुरु केली. घोडावत समूहाच्या आयटी व डिजीटल क्षमता वाढवण्याचे सर्व श्रेय या संस्थेला जाते.
सन २०१९ साली नॉन फूड विभागात घोडावत समूहाने आयुरस्टार यामध्ये (हेअर ऑइल, अगरबत्ती, वॉशिंग पावडर, हॅन्डवॉश, फेसवॉश) आणि त्यासोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही त्यांनी मोठी गुंतवणूक केली. घोडावत स्कायस्टार (गोरेगाव पश्चिम), घोडावत ट्युलिप (नवी मुंबई), घोडावत डेझी ( नवी मुंबई), लाईफ मॉटेज (पुणे) या महत्त्वकांक्षी प्रकल्पांचा रिएल इस्टेटमध्ये समावेश आहे. लोकल मार्टच्या माध्यमातून ते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहचले. 3000 स्टार लोकल मार्ट सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या माध्यमातून 25000 लोकांना रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. मेट्रो सिटीमध्येच उद्योगधंदे यशस्वी होतात असे नाही. आपल्या पंचक्रोशित उभा केलेला हा उद्योग खेड्यांचा, गावांचा आणि आपल्या लोकांचा विकास करत असतो. आपले लोक मोठे झाले की आपोआप आपण मोठे होत असतो. असे प्रगल्भ विचार संजयजींचे असल्यामुळे त्यांनी व्यवसायासोबतच समाजसेवेलाही तितकेच प्राधान्य दिले. आचार्य तुलसी ब्लड बँक,
ज्येष्ठांसाठी माउली केअर सेंटर त्यांनी सुरु केले आहे. संजय घोडावत फाउंडेशनच्या माध्यमातून महापूरामध्ये लोकांना केलेली मदत, कोरोना काळात केलेले समाजकार्य, कोरोना काळात सामान्य माणसांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नव्हत्या किंवा दवाखाने उपलब्ध होत नव्हते. अशावेळी स्वतःचे शिक्षण संकुल कोविड सेंटर म्हणून उपलब्ध करून दिले. जवळपास साडे सदतीस हजार कोरोना रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले. असे कोरोना महामारीच्या काळात महान समाजकार्य त्यांनी केले. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना केलेली मदत, अंध मुलांसाठी सुरू असलेली शाळा, पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्षारोपण एक ना अनेक अश्या कित्येक समाजकार्याच्या गोष्टी सांगाव्यात संजयजींच्या. ‘बोले तैसा चाले’ ही उक्ती सार्थ करत संजयजींनी स्वतः ८२ वेळा रक्तदान करण्याचे समाजकार्य केले आहे. संजयजीनी समाजकार्य केले पण त्याचा कधीच गाजावाजा किंवा शो केला नाही. त्यांचे असे विचार आहेत की आपण नेहमी निरपेक्ष व निस्पृहतेने सत्कार्य करत रहायचे.
“परिफुल्या पाखरांसाठी
पवित्र असा वटवृक्ष रोविला
जो वस्तीला आला
त्याला ताटामधला घाससुद्धा दिला”
ही कर्मवीर अण्णांची उक्ती सार्थ ठरवत. आपल्या भागात उद्योगधंद्याच्या विकासामुळे लोकांना कामधंदा मिळतो पण त्यांना दर्जेदार व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने २००८ साली सौ सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शिक्षणाची पंढरी केजी टू पीजी एकाच छताखाली कोल्हापूर जिल्ह्यात अतिग्रे गावानजीक संजयजींनी २००९ साली संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या माध्यमातून शिक्षण संकूल उभे केले. परदेशातील एखादया नामवंत विद्यापीठाला लाजवेल इतक्या अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता व दर्जेदार शिक्षण त्यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
अवघ्या 60 विदयार्थ्यांवर सुरू केलेले हे शिक्षण संकुल आज जागतिक स्तरावरील आयएसओ प्रमाणित विदयापीठात रुपांतरीत झाले आहे. 18000 हुन अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
त्यांनी सन २०१० साली आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे, कोल्हापूर येथे सुरु केले आहे. तेथे निवासी व अनिवासी या दोन्ही प्रकारे सीबीएसई, केंब्रिज, आय बी बोर्डचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. इंटरनॅशनल स्कूलच्या शाखा बेळगाव व (मुळशी) पुणे या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी केंब्रिज, अमेरिकन व आय बी बोर्डचे शिक्षण दिले जाते. एज्युकेशन वर्ल्डच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सन २०१४ पासून संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमी सुरु करून संजयजींनी दहावी नंतर कोटा अथवा दिल्ली या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याहीपेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण जेईई व नीट कोचिंग सेंटर आपल्या परिसरातच उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या शाखा कोल्हापूर, अतिग्रे, सोलापूर, लातूर, पुणे, कराड, सातारा, बीड, बेळगावी, हैद्राबाद, परभणी व नगर या ठिकाणी आहेत. संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या इचलकरंजी, सांगली व मिरज (तानंग) अशा तीन ठिकाणी शाळा आहेत. सन २०१२ साली संजय घोडावत पॉलिटेक्निकही सुरु करण्यात आले. या ठिकाणी अभियांत्रिकी शाखेचे विविध पदविका कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सन २०१७ साली नॅक ‘अ’ मानांकन प्राप्त झाल्यानंतर इन्स्टिट्यूशन्सचे रुपांतर संजय घोडावत विद्यापीठात झाले. विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, कॉमर्स, लिबरल आर्टस, डिझाईन, एरोस्पेस इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, इत्यादी सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचसोबत ट्रस्टच्या माध्यमातून स्वयंअर्थसहाय्यित एक कन्या महाविद्यालयही चालवले जात आहे. एमपीएससी, युपीएससी व बँकिंग इत्यादी प्रशासकीय सेवा परीक्षांसाठी २०१६ पासून अतिग्रे व कोल्हापूर या ठिकाणी संजय घोडावत प्रशासकीय सेवा सुरु करण्यात आली आहे.
इतर सर्व उद्योगधंद्यापेक्षा ‘संजय घोडावत शिक्षण संकूल’ हा संजयजींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. संजयजी म्हणतात, “शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. ज्याद्वारे कोणीही जगाला बदलू शकतो. आजची तरुण पिढी सक्षम, व्यवहारी व कार्यक्षम बनवण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण गरजेचे आहे.”
रिअल इस्टेट, वस्त्रोद्योग, कृषी, रिटेल, ऊर्जा, ग्राहक उत्पादने, व शिक्षण अशा सर्व क्षेत्रात संजयजींनी एक मोठे स्थान निर्माण केले असले अथवा विश्वासार्हता निर्माण केली असली तरी अजूनही त्यांचे एक स्वप्न अपुरेच होते. ते पूर्ण होण्यासाठी 2019 साल उजडावे लागले. बालपणी आकाशात उडणाऱ्या विमानाकडे कौतुकाने पाहणारा हा मुलगा म्हणजेच संजयजी यांनी स्वतः अमेरिकेमध्ये जाऊन पायलटचे शिक्षण पूर्ण केले. स्वत: पहिल्यांदा वैमानिक झाले. मग कोल्हापूर जिल्हयाच्या इतिहासात प्रथमच या एका स्थानिक उद्योगपतीने देशांतर्गत विमानसेवा उद्योगात शिरकाव केला. स्टार एअरलाईन्सच्या माध्यमातून आता संजयजींचे नाव देशाबाहेर परदेशातही मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले आहे . बेंगळूरू व बेळगावी या विमानतळावरून मुंबई, जयपूर, अहमदाबाद, तिरुपती, हैद्राबाद, पुणे, नागपूर, सुरत, लखनऊ या सारख्या प्रमुख २२ शहरांमध्ये ‘स्टार एअरलाईन्स’ काम करते. संजय घोडावत ग्रुपकडे स्वतःची ३ हेलिकॉप्टर व ९ विमाने आहेत. संजयजी म्हणतात, “नम्रतेसोबत, हार्डवर्क, स्मार्टवर्क आणि निश्चय या चार चाकावरच यशाचे वाहन चालते. यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड मह्त्त्वाकांक्षा असली पाहिजे, जीवनाला शिस्त असली पाहिजे, माणसे हाताळण्याचे कसब असले पाहिजे आणि वचनबद्धता असली पाहिजे. ते पुढे म्हणतात, टाटा समूहानंतर संजय घोडावत उद्योगसमूह हा एकमेव उद्योग समूह आहे जो मीठापासून एअरलाईन्सपर्यंत विविध क्षेत्रात काम करतो.” संजयजींनाही पाश्चिम महाराष्ट्रातील टाटा म्हंटले जाते. ते फक्त उदयोग व इतर क्षेत्रातील प्रगतीमुळे नाही. तर टाटांच्याप्रमाणेच देशभक्ती व समाजसेवा संजयजींच्या अंगी ठासून भरली आहे. कितीही उंच भरारी घेत असले तरीही संजयजी नेहमीच जमिनीवर असतात. आपल्याकडील सामान्य कर्मचाऱ्याशीही ते प्रेमानेच बोलतात. संजय घोडावत समूहामध्ये आज १६,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. ज्याची सुरुवात अवघ्या 2 कर्मचा-यांपासून झाली होती. ‘इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ सन २०२७ पर्यंत संजय घोडावत ग्रुपची वार्षिक उलाढाल ८५०० करोड करण्याचे ध्येय असल्याचे संजयजी सांगतात.
साध्यातल्या साध्या गोष्टीकडे आजही संजयजी वैयक्तिक लक्ष देतात. दिवसाचे अठरा तास ते दररोज काम करतात. स्वच्छतेला अत्यंत महत्व देणारे संजयजी म्हणतात, ‘स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते.’ जगात आपण नेहमीच अव्वल असावे यासाठी त्यांची नेहमीच धडपड चाललेली असते. आपल्याकडून नेहमीच प्रत्येकाला बेस्ट देण्याचे काम ते करत असतात. अशा या प्रभावी व्यक्तीत्वाला, कर्तृत्वाला, नेतृत्वाला, दातृत्वाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!
“आपल्या कर्तृत्वापुढे हिमालय ठेंगणा व्हावा,
आपल्या नेतृत्वापुढे समुद्राला संकोच वाटावा,
झेप घ्यावी आपण अशी की गरुडालाही हेवा वाटावा.”
शब्दांकन – प्रा.श्री संदीप व्हनाळे
मराठी विभागप्रमुख
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल