दुर्गाचा डोंगर, चाफेड गावातील एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण

ग्रामस्थांच्या सहकार्याने दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे लवकरच याचे संवर्धन होणार

      प्राचीन काळापासून कोकण भुमीत शेकडो सत्तांतर झाली. यातून आपल्या कोकणात अनेक डोंगरावर गड कोट निर्मिती करण्यात आली. यातील अनेक गड कोट काळाच्या ओघात नष्ट झाले. तर काही दुर्ग कालांतराने दुर्लक्षित झाले. काही ठिकाणांचा कागदोपत्री उल्लेख आढळतो तर काहींचा तर कुठे उल्लेखही सापडत नाही. असेच एक देवगड तालुक्यातील चाफेड या गावी असलेले दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण  म्हणजे दुर्गाचा डोंगर
      ऐतिहासिक दस्ताऐवजात कुठेही उल्लेख नसलेला सुमारे १५०० फूट उंच २० एकर परिसर असलेल्या या डोंगराच्या उत्तरेला कोळोशीचे निशाण टेंब तर दक्षिणेला साळशीचा सदानंद गड आहे. चाफेड गावचे सरपंच किरण मेस्त्री, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, हेमालता सावंत प्रसाद पेंडूरकर तसेच चाफेड मधील ग्रामस्थ यांनी सदर ठिकाण उजेडात यावे यासाठी नुकतीच या दुर्गाच्या डोंगराची भ्रमंती केली.
      या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री गांगेश्वर मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन डोंगर चढायला सुरुवात केल्यास पंधरा वीस मिनिटात डोंगरावर पोहचता येते. डोंगरावर खूप झाडी वाढलेली आहे. ती साफ करत डाव्या बाजूला दक्षिणेस एका वर्तुळाकार कातळात कोरलेल्या विहिरीपाशी जावे. वरच्या बाजूला काही ठिकाणी काहीसे बांधकाम केलेले दिसते. घोडे याठिकाणी पाणी प्यायचे असे स्थानिकांचे मत आहे त्यामुळे याला घोड्याची पाग असेही म्हणतात.
      जवळच आपल्याला गडाची तटबंदी आढळते. डाव्याबाजूला उत्तरेकडे जाताना आपल्याला दुर्गाचा चाळा हे ठिकाण लागते. याठिकाणी आपल्याला कोसळलेला बुरुज, आत येण्यासाठी उध्वस्त दरवाजा चावडी सारखे बांधकाम तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे चौथऱ्यासारखे बांधकाम आढळते. हे पाहून झाल्यानंतर आम्ही उत्तरेकडे जरा पुढे गेल्यानंतर त्याच स्वरूपातले बांधकाम दिसते. मधोमध याला पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरत अजून जरा पुढे गेल्यावर १० बाय १० फुटाची बुजलेली पाण्याची टाक आपणास दिसते. याला लागूनच ४० बाय ४० फूट तसेच ४० फूट खोल चौकोनी विहीर आपणास दिसते. सद्या या विहिरीत अनेक झाडे उगवलेली आहेत. जवळच्या काड्यावरून आपणास सदानंद गड दिसतो.
      या विहिरीच्या पुढे आपण पूर्वेकडे चालत गेल्यास तीस ते चाळीस फूट खोल कातळ खोदून पूर्व दिशेला तोंड असलेला दरवाजा खोदण्यात आलेला आहे. या कोरून काढण्यात आलेल्या दरवाज्याचा भाग कोसळल्यामुळे गुहेच्या आकाराचा हा दरवाजा बुजलेला आहे. कोसळलेल्या भागामुळे या दरवाज्यास मोठ्या गुहेचा आकार प्राप्त झालेला आहे. या दरवाज्यात आवश्यक त्याठिकाणी चिरेबंदी बांधकाम केलेले दिसून येते. दरवाज्याच्या मुखाशी सैनिकांना बसण्यासाठी जागा आहे. कोसळलेल्या  भागाचे निरीक्षण केल्यास आपल्याला पूर्वीच्या दरवाज्याचा अंदाज येईल. सद्या या गुहेसारख्या भागात वटवाघळांचा वास आहे. या दरवाज्यापाशी आपली दुर्गाच्या डोंगराची भ्रमंती पूर्ण होते.
      ग्रामस्थांच्या सांगण्यावरून या डोंगरावरील वस्ती होती परंतु काही कारणाने याठिकाणची वस्ती उठली. त्यामुळे या भागात लोक यायला घाबरत असत. गडावर जंगलात काही घरांच्या ज्योत्याही आढळतात. लवकरच ग्रामस्थांच्या सहकार्याने दुर्ग मावळा प्रतिष्ठान या दुर्गाच्या डोंगरावर संवर्धनचे कार्य हाथी घेणार आहे. या डोंगरावरील आवशेष बघता याठिकाणी पूर्वी गड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. याबाबत काही माहिती उपलब्ध असल्यास चाफेड ग्रामपंचायतला पुरवावी असे आवाहन चाफेड ग्रामपंचायतचे सरपंच किरण मेस्त्री यांनी केले आहे.
      या भ्रमंती मोहिमेमध्ये पंढरीनाथ कांडर, सुधाकर भोगले, महेश परब, आकाश राणे, संतोष साळसकर, तुकाराम घाडी, प्रदीप घाडी, सोहम घाडी, महेश घाडी, विलास घाडी, दयानंद राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!