सिंधूरत्न समृद्धी योजनेचा लाभ घेऊन उद्योजक व्हा – किरण सामंत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता संकुल ओरोस येथे माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये जलजीवन मिशन व उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी उद्योजक किरण सामंत उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना किरण सामंत म्हणाले की युवकांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजकतेकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना उपयोगी असून त्याचा फायदा युवकानी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. या योजनेमध्ये 40% सबसिडी असलेले शेतीपूरक उद्योग आपण उभे करू शकता. तसेच या राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांच्या माध्यमातून योग्य ती मदत करण्यात येईल असे ते म्हणाले. सिंधूरत्न समृद्ध योजनेमध्ये जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करून आपण उद्योजक बनावे व इतरांना रोजगार द्यावा असे आवाहन त्यांनी सिंधुदुर्ग मधील जनतेला केले. महोत्सवामध्ये आयोजन केलेल्या भरडधान्य पाककला प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंतभोसले, सुमेधा तावडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया व प्रधानमंत्री रोजगार हमी योजना याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. बाळकृष्ण गावडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र