कुडाळ ते बाव रस्त्याच्या कामाची मागणी आपण केली होती !

ठाकरे गटाच्या नगरसेविका ज्योती जळवी यांचे शिंदे गटाला प्रत्त्युत्तर
कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ ते बाव या रस्त्यासाठी देण्यात आलेल्या निधीबाबत आता शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. कुडाळ ते बाव या रस्त्याची दुरवस्था झाली असून
मागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्याकडे केली होती. त्यामुळे या रस्त्याला शिवसेना शिंदे गटाकडून भरीव निधी मंजूर झाला, असे अरविंद करलकर यांनी जाहीर केले होते.
मात्र, हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आपण खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती, असे स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या नगरसेविका ज्योती जळवी यांनी केले आहे. त्यामुळे कुडाळ ते बाव रस्त्याला देण्यात आलेल्या निधीवरून श्रेयवाद सुरू झाला आहे.
गेल्यावर्षी या रस्त्याचे काम बजेटअंतर्गत मंजूर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. परंतु, मध्यंतरीच्या काळात सरकार बदलल्यामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली, अशी माहिती ठाकरे पक्षाच्या कुडाळ नगरसेविका ज्योती जळवी यांनी दिली आहे.
कुडाळ तालुक्यातील बाव रस्ता हा कुडाळ कविलकाटे, बांबुळी, बाव, सोनवडे या गावातून जातो. सद्यस्थितीत हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे व त्रासदायक बनले आहे. परिणामी, लोकांमध्ये नाराजी आहे. या रस्त्याच्या कामाबाबत आपण स्वत: लक्ष घालून लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता सुस्थितीत करून मिळावा, तशा सूचना बांधकाम विभागाला द्याव्यात. आपण आपल्या माध्यमातून कोणत्याही योजनेतून या कामाकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ज्योती जळवी यांनी केली आहे.