मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष बाप्पा नाटेकर यांच्याकडून करण्यात आले वाटप
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष तथा मळगाव ऐक्यवर्धक संघाचे संचालक पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्याकडून मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हा स्तरावर निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा क्रीडा गणवेश व शालेय साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला.
यावेळी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, मळगाव ऐक्यवर्धक संघाचे संचालक रामचंद्र केळुसकर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण सदस्या रागिणी शिरोडकर, विष्णू राणे, शारदा विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत आदी उपस्थित होते.
तालुकास्तरावर यश मिळविलेल्या आणि जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बाप्पा नाटेकर यांनी क्रीडा गणवेश वाटप करत समूह नृत्य स्पर्धेतील मुलींना वह्या वाटप केल्या. यावेळी नाटेकर यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही असेच यश मिळवा अशा शुभेच्छा देऊन याच्यापेक्षाही मोठा सत्कार करण्यात येईल, असे सांगितले. या वाटपाबद्दल मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी नाटेकर यांचे आभार मानले.
सावंतवाडी, प्रतिनिधी