पत्रकारितेतही उत्तम करियरची संधी – निलेश जोशी

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ‘पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन
प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या काळात फक्त बातमीदारीच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या दहा ते बारा प्रकारच्या रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सुद्धा एक चांगले करियर म्हणून पाहायला हरकत नाही, असे प्रतिपादन पत्रकार निलेश जोशी यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी’ या विषयावर पत्रकार निलेश जोशी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री जोशी यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध प्रकारच्या संधींचा परिचय करून दिला. मुद्रित माध्यमापासून ते इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियापर्यंत होत गेलेल्या बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन करणे महत्त्वाचे आहे. तुमच्यापाशी उत्तम माहिती असायला हवी. त्याबरोबरच निरीक्षण, सजगता, सतर्कता आणि बहुश्रुतता आवश्यक आहे असेही ते म्हणाले. जवळपास पंचवीस वर्षाच्या या क्षेत्रातील आपल्या अनुभवांच्या आधारे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. बातमी लिहिल्यापासून ती वृत्तपत्रातून वाचकांच्या हाती पोहोचेपर्यंत तिच्यावर होणाऱ्या विविध टप्प्यातल्या संस्काराविषयी त्यांनी अतिशय बारकाव्यांसहित माहिती दिली.त्याचबरोबर पत्रकारितेतील आपले अनुभव सुद्धा सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एस.एन. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील असलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन निलेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू आसोलकर यांनी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कॅप्टन डॉ. आवटी यांनी करून दिला. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





