अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयिताला जामीन
संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद
कणकवली : वैभववाडी तालुक्यात करूळ चेकपोस्ट येथुन अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आबासो राजाराम बाबर (४२ सातारा) याची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी युक्तिवाद केला. याबाबत पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत 5 लाख 35 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दिवशी न्यायालयीन कोठडी दिली. व त्यानंतर तालुका न्यायालयात याबाबत जामीन करता अर्ज करण्यात आला. तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी जिल्हा न्यायालय एस. जे. भारुका यांच्याकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी होत साक्षीदारांवर दबाव न आणणे, यासह अन्य अटी – शर्तीवर 15 हजाराच्या जामिनावर संशयित आरोपीची मुक्तता करण्यात आली.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली