भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्त्याला महाविकास आघाडी सरकारकडूनच मंजुरी

भाजपने फुकाचे श्रेय घेऊ नये मंगेश सावंत यांचा टोला
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा करता अनुदान वर्ष 2021 22 या योजनेअंतर्गत भिरवंडे वृद्धाश्रम ते रामेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्यासाठी 30 लाखाचा निधी हा महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर करण्यात आला आहे. तसे मंजुरीचे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडून मार्च 2022 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते. खासदार विनायक राऊत यांनी केलेला पत्रव्यवहार व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केलेल्या पाठपुरावा यामुळे हा रस्ता मंजूर झाला आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करत फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे असे माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना हरकुल बुद्रुक विभागप्रमुख मंगेश सावंत यांनी सांगितले
भिरवंडे रामेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याला आमदार नितेश राणे यांनी निधी मंजूर करून दिल्याचे सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रम येथे बुधवारी केलेले भूमिपूजन म्हणजे फुकाचे श्रेय घेण्याचा खटाटोप आहे. हा रस्ता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेला आहे. तत्कालीन पालकमंत्री यांना खासदार विनायक राऊत साहेब यांनी दिलेल्या पत्रानुसारच हा निधी जिल्हा नियोजन विभाग मार्फत मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी 7 मार्च 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून हे काम पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा करता अनुदान सन 2021/ 22 अंतर्गत मंजूर असून त्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात यावे असे पत्रात नमूद केले आहे. हे काम महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर असून त्यासाठी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.असे असतानाही केवळ श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी करत भूमिपूजनाचा खटाटोप भाजपकडून करण्यात आला आहे असे मंगेश सावंत यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी




