विज्ञान समजून घेतले की अंधश्रद्धा गळून पडतात

गुरुवर्य के एम पटाडे सर यांचे प्रतिपादन

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान यांचा आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्य पुरस्कार समारंभ

घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे विज्ञानाचे नियम आहेत. ज्या गोष्टी चमत्कार म्हणून दाखवल्या जातात, त्या कोणालाही करता येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आहेत, असे प्रतिपादन गुरुवर्य के. एम पटाडे सर यांनी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान , कणकवली यांचा आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करताना केले. सदर कार्यक्रम कणकवली कॉलेज HPCL सभागृहात घेण्यात आला.
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान यांचे लक्ष्मण साबाजी पवार सामाजिक कार्य पुरस्कार निवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर व प्रयोगशाळा सहाय्यक अनिल चव्हाण यांना प्रदान केला गेला. सदाशिव पवार आदर्श शिक्षक पुरस्कार तेजस बांदिवडेकर, वजराट याना प्रदान केला गेला. मानचिन्ह आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन स्वच्छतादूत समीर शिर्के यांनी बाबासाहेब आंबेडकर, सदाशिव पवार गुरुजी, लक्ष्मण आणि सरस्वती पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केले. श्याम मानव यांची पुस्तके देऊन मान्यवरांचे स्वागत केले गेले. मैत्रेयी चव्हाण हिने संविधान उद्देशिका वाचून दाखवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ सतीश पवार यांनी प्रतिष्ठान गेली तीन वर्षे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार देते. यावर्षी विजय चौकेकर आणि अनिल चव्हाण यांची अंधश्रद्धा निर्मुलनाची तळमळ बघून प्रथमच सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देणे चालू केले , असे प्रतिपादन केले.

 अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रा. श्याम मानव सरांनी स्थापन करताना आमचा देव धर्माला विरोध नाही ही भूमिका घेऊन स्थापन केली आणि गेली ४० वर्ष याच पायावर समितीचे कामकाज चालू आहे . असे सत्काराला उत्तर देताना विजय चौकेकर यांनी सांगितले.

"माझी शाळा माझा ऑक्सीजन असून,  ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. नोकरी ही नोकरी म्हणून न करता ती सेवा म्हणून करावी. हा न मागता मिळालेला पुरस्कार घेणारा जरी मी असलो तरी या मागे अनेक जणाचे परिश्रम आहेत हे विसरून चालणार नाही.  " असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना तेजस बांदिवडेकर यांनी केले. बांदिवडेकर यांचा ग्रामीण भागातील मुलांना शिष्यवृत्ती मिळवून द्यायचा वजराट पॅटर्न आता सर्वप्रसिद्ध झाला आहे.

पारंपरिक अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांना छेद देवून सर्व सामान्य समाजासाठी पुरोगामी विचार प्रचार व प्रसार करण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आणि संघर्ष आहे. गेली 32 वर्ष या अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा विरोधी कायद्याचा तळागाळातील समाजापर्यंत प्रचारासाठी प्रयत्न करत असताना स्थानिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ‘शोध भूताचा’ या उपक्रमातून वेगवेगळ्या 26 स्मशानांचा अभ्यास करून चालिरीती व इतर अंधश्रद्धा चमत्कार प्रात्यक्षिकांसह शेकडो कार्यक्रम केले करत आहे. स्वतः पुरोहिताचे काम करून 29 गरिब कुटुंबातील विवाह अल्पखर्चात लावून दिली. घर प्रपंच नोकरी सांभाळून सोबत नशाबंदी, ग्राहकहक्क. या कार्याची ओळख आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविल्यामुळे मला कामाला नवीन बळ प्राप्त झाले आहे असे अनिल चव्हाण यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक यांचे कौतुक करून पटाडे सर म्हणाले की तीस पस्तीस वर्षांपूर्वी एन टी एस ही राष्ट्रीय महत्वाची शिष्यवृत्ती या भागात कोणाला माहीत नव्हती. नागपूर येथील एका प्रशिक्षण वर्गात त्याचे महत्व माझ्या लक्षात आल्यावर मी नरडवे सारख्या अत्यंत ग्रामीण भागातून त्याचे मार्गदर्शन करून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली आहे. वसुंधरा विज्ञान प्रसार केंद्र इथे केलेल्या कामाला उजाळा देताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी स्वतः येथील काम विज्ञानाचे नियम लक्षात आले की अंधश्रद्धा संपतील असे ते म्हणाले.

हरकुळ खुर्द येथे अनुसूचित जातीच्या लोकांवर होत असलेला मंदिरातील अन्याय बंद व्हावा म्हणून आवाज उठवणाऱ्या मंगेश चव्हाण, सचिन चव्हाण आणि आकाश चव्हाण यांचा यावेळी मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विधिज्ञ राजीव बिले आणि उपक्रमशील शिक्षिका स्नेहलता राणे सरंगले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले

यावेळी व्यासपीठावर शुभांगी पवार, नुपूर पवार, संगीता पवार, हरिश्चंद्र सरमळकर, वेदांत पवार, नितांत चव्हाण , राजन चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता पवार यांनी केले. आभार प्रदर्शन सीमा पवार यांनी केले. मनाली राणे, शैलेश घाडी, ओंकार चव्हाण, भूषण मेस्त्री यांनी तांत्रिक सहकार्य केले.

कणकवली(प्रतीनिधी)

error: Content is protected !!