अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे आठ खंड, ऑडिओ व ई -बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
कणकवली/मयुर ठाकूर
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्याचे आठ खंड व ऑडिओ, ई -बुकचे प्रकाशन नुकतेच मुंबई विद्यापीठातील दिक्षांत सभागृहात महामहीम राज्यपाल श्री रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ,विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष ना.चंद्रकांत दादा पाटील,शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दीपक केसरकर, समितीचे सदस्य सचिव प्रोफेसर डॉ.संजय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते व समिती सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे संशोधन संकलन आणि संपादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२१ ला साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे या समितीचे अध्यक्ष तर उच्च शिक्षण संचालक हे पदसिद्ध निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील प्रोफेसर डॉ.संजय शिंदे हे समितीचे सदस्य सचिव तसेच कोकणातून डॉ. सोमनाथ कदम हे समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने मागील तीन वर्षापासून अण्णाभाऊंच्या साहित्याचे संकलन ,संशोधन, संपादन व प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सदस्य सचिव प्रोफेसर डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास व संकलन करून निवडक कथा आणि कादंबऱ्याचे आठ खंड तयार केले तसेच देश आणि विदेशातील वाचकांना अण्णाभाऊंच्या साहित्याचे अधिक सूक्ष्मपणे वाचन करता यावे म्हणून वरील आठही खंड ऑडिओ व ई बुक स्वरूपात तयार करण्यात आले आहेत.
या सर्व साहित्याच्या प्रकाशनाचा समारंभ काही महिने रखडला होता. तो नुकताच दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.
यावेळी साहित्यरत्न ,अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे ज्येष्ठ सदस्य प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर ,प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड ,डॉ. मिलिंद कसबे, डॉ. विजय कुमठेकर, श्री शिवा कांबळे,डॉ. शरद गायकवाड ,डॉ.देवकुमार अहिरे व अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन साठे उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या आठ खंडाच्या ऐंशी हजार प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्य शासनाच्या मुंबई, पुणे ,नागपूर, कोल्हापूर , नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती शासकीय ग्रंथालयात या प्रती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती समिती सदस्य डॉ.सोमनाथ कदम यांनी दिली.