ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला हा जनाधार आणि जनमतसुध्दा अजितदादांच्या पाठीशी – सुनिल तटकरे

गडचिरोली – आम्ही ‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हा दौरा सुरू केला आणि राज्यात ग्रामपंचायत निकाल आला हा योगायोग आहे. भाजपनंतर आम्ही दुसर्या क्रमांकावर आलो हा जनाधारसुध्दा आणि जनमतसुध्दा अजितदादांच्या पाठीशी आहे हे स्पष्ट झाले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर काहीजण टिका करत आहेत आणि सिनेमात जशी ग्लिसरीन लावून रडतात तसे ग्लिसरीन लावून काहीजण येतात आणि रडतात असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.
विचारधारेच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली असे काहीजण सांगत आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत गेलो तर आम्ही विसंगत भूमिका घेतली आहे असे ओरडून सांगत आहेत मात्र आमची भूमिका कशी आहे हे लोकांपर्यंत जावी यासाठी आम्ही ‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हे अभियान सुरू केले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याची खबरदारी आमचे सरकार घेत आहेत आणि आमच्या पक्षाचीही भूमिका आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आदी उपस्थित होते.