Climate Action Project 2023 या ग्लोबल प्रोजेक्ट मध्ये ठाणे मनपा शाळा क्र 55 च्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि 10 देशांशी कोलाब्रेशन

ठाणे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी Climate Action प्रोजेक्ट 2023 या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सहभागी होऊन ठाणे महापालिका शाळेचे नाव जागतिक पातळीवर नेले. शालेय अभ्यासाबरोबरच शाळेत घेतले जाणारे पर्यावरणपूरक विविध उपक्रम हे या शाळेचे वैशिष्ट्य आता जागतिक पातळीवरील एका महत्त्वाच्या उपक्रमात नोंदले गेले आहे. या उपक्रमासाठी ठाणे महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) उमाकांत गायकवाड, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, गटाधिकारी संगीता बामणे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या आवारात मोकळी जागा नसल्याने शाळेतील उपक्रमशील शिक्षिका नूतन बांदेकर यांनी त्यावर तोडगा म्हणून शाळेच्या टेरेसचे रूपांतर सुंदर अशा बागेत करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी ‘हिरवे स्वप्न’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांना बागकामाचे धडे देण्यास सुरुवात केली. आधी 30 ते 40 कुंड्यांमध्ये असलेली बाग मागील वर्षी 330 कुंड्यांपर्यंत पोहोचली. या उपक्रमातून बागकामाबरोबरच घरातील ओला कचरा सुका कचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, नारळाच्या शेंडीपासून कोको पीट निर्मिती, कांद्याच्या सालांपासून जंतुनाशक निर्मिती, प्लास्टिकचा पुनर्वापर असे पर्यावरण शिक्षण मुले घेत आहेत. सुका पालापाचोळा आणि कंपोस्ट खत यावर बहरलेली ही बाग म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहे. संपूर्ण टेरेस च्या भिंती, जमीन यावर पर्यावरण पूरक संदेश देणारी तसेच वारली चित्रशैलीतील चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांनी टेरेसचे एका सुंदर बागेत रूपांतर केले आहे. काही मोठ्या लाकडी बॉक्सेस मध्ये मेथी, पालक, मोहरी, घेवडा, कारले, वांगी, मिरची, मटार गाजर, बीट, कांदे, बटाटे, लिंबू, टोमॅटो,अळू, आले, लसूण, हळद अशा भाज्यांची लागवड केली. तर काही कुंड्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली. त्यामध्ये शतावरी, शंखपुष्पी, ओडोमॉस, लाजाळू, वेखंड, ब्राह्मी, पुदिना, शमी, अडुळसा इत्यादी वनस्पतींची लागवड केली. काही कुंड्या फुलझाडांनी सजल्या. त्यात गुलाब, जास्वंद, अबोली, हळदीकुंकू, सोनटक्का, रातराणी, मोगरा, पिवळी बेलफ्लॉवर्स, सदाफुली, अशी अनेक प्रकारची फुलझाडे लावली गेली. तर जून महिन्यात मुलांनी आंबा, सीताफळ, पपई, जांभूळ, बदाम यांच्या बिया जमवून त्यांची रोपे तयार केली, ती फळबाग विभागात आहेत
अनेक कुंड्यांमध्ये शो प्लान्टस, मनी प्लांट, कॅक्टस, नेचे, रंगीत शोभेचे अळू अशी अनेक प्रकारची शोभिवंत झाडे लावली गेली. प्लॅस्टिक बॉटल्स रंगवून त्यात मनीप्लांटस लावण्यात आले. या बॉटल्स लोखंडी खांबांभोवती बांधण्यात आल्या. या सगळ्या कुंड्या विशिष्ट प्रकारे नियोजन करून ठेवल्या गेल्या. या गार्डनमध्ये भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे असे विभाग करण्यात आलेले आहेत.

     जागतिक पातळीवर दरवर्षी होणाऱ्या Climate Action Project मध्ये यावर्षी या शाळेने आपला सहभाग  नोंदवून आपला पर्यावरण विषयक उपक्रम जगातील 153 देशांपर्यंत पोहोचवला आहे. त्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात इतर देशातील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी या मुलांना मिळाली. या इंटरनॅशनल कोलॅब्रेशनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी सर्बिया, पोर्तुगाल, युक्रेन, स्पेन, नायजेरिया, शारजा (युनायटेड अरब अमिरती), श्रीलंका, पाकिस्तान, सायप्रस अशा विविध दहा देशातील शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. आपल्या परीने वातावरण बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी काही सोल्यूशन्सचे सादरीकरण केले. "सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सर्व शाळांना आपल्या देशातील, आपल्या शहरातील वातावरण बदलाची कारणे आणि त्याचे होत असलेले परिणाम याविषयी माहिती दोन्ही देशातील विद्यार्थी एकमेकांना देत असतात, त्यामुळे माहितीची देवाणघेवाण होते, ज्ञानात भर पडते आणि विद्यार्थी समृद्ध होतात", असे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले. या ऑनलाईन मिटिंग्जसाठी ट्रान्सलेशन साठी श्रीलता मेनन यांनी आणि तंत्रज्ञान सहाय्य नंदिनी तिवारी आणि शाफिक शेख (शिक्षक ठाणे मनपा) यांचे सहाय्य लाभले. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. 
      ठाणे महापालिका शाळेची ही उत्तुंग झेप वाखाणण्याजोगी आहे. त्यासाठी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!